लंडन: ब्रिटन मधली एक घटना प्रचंड व्हायरल होत आहे. इथे एका व्यक्तीला रात्री एका महिलेची आरडाओरड ऐकू आली. ती मदतीसाठी आरडाओरड करत होती. या व्यक्तीला प्रश्न पडला की या महिलेला काय अडचण आली असेल. त्याने पोलिसांत जाऊन लगेच तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील या तक्रारीची तातडीने दखल घेत शोध मोहीम सुरु केली. पोलीस त्या व्यक्तीच्या शेजारील घरात गेले जिथून त्या महिलेचा आवाज आला होता. पुढे जे झालं ते खूप आश्चर्यकारक होतं. पोलिसांना जेव्हा खरी गोष्ट समजली तेव्हा पोलीस खूप हसले. काय आहे ती घटना? जाणून घेऊया…
झालं असं की ब्रिटनच्या एका रहिवाशाला एका रात्री शेजारच्या घरातून एका महिलेचा मदतीसाठी आवाज ऐकू आला, ही महिला मोठ्याने ओरडत होती. या रहिवाशाने लगेच पोलिसांत धाव घेतली. पोलीस त्या शेजारच्या घरात आले तेव्हा त्यांना वाटलं आपण चोराला पकडलं. मालकाने पोलिसांना बघितलं आणि त्याला धक्काच बसला, त्याला वाटलं, “मी काय केलं?”. पोलिसांच्या तपासात जे उघड झालं ते खूप हास्यास्पद होतं. ज्या घरातून हा आवाज आला होता त्या घरमालकाला पक्षी पाळायला खूप आवडतात. ज्या महिलेचा आवाज त्या व्यक्तीला आला होता ती कोणती महिला नसून मुळात एक पोपट होता. हे जेव्हा पोलिसांना समजलं तेव्हा पोलीस प्रचंड हसले.
ज्याला पक्षी पाळायला आवडतात त्याच नाव स्टीव्ह वूड. 11 जुलै रोजी स्टीव्ह वूडच्या कॅनवे बेटावरील घरी पोलिसांनी तीन वाहने पाठवली. मात्र, पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा ‘ओरडणारी महिला’ खरोखरच पोपट असल्याचे समजले आणि पोलीस अवाक झाले. कॅनवे बेटावरील स्टीव्ह वुड्स या व्यक्तीने 21 वर्षांपासून आपल्या घरात पक्षी पाळले आहेत. त्याच्या या पोपटाचा आवाज महिलेसारखा आहे. स्टीव्ह वूड म्हणाले, “माझे पक्षी सहसा सकाळी खूप आवाज करतात. त्या दिवशी फ्रेडी खूप गोंगाट करत होता, त्याचा आवाज महिलेसारखा आहे त्यामुळे हा सगळा गोंधळ उडाला.”