गाडी चालवता चालवता चालकाला डुलकी लागली आणि त्यामुळे अपघात (Accident) ही गोष्ट आपल्याला ऐकण्यात आहे. अशा गोष्टी ऐकण्यासाठी आपल्याला नवीन नाहीत. पण कधी असं ऐकलंय का की वैमानिकाला डुलकी लागली? बापरे…कुणी मजेत सुद्धा हा विचार करणं टाळेल. अशीच एक बातमी व्हायरल (Viral) होतीये ज्यात विमानाचे दोन्ही वैमानिक 37 हजार फूट उंचीवर विमान असताना गाढ झोपले आणि चक्क गजर लँडिंग (Forgot Landing) करायला विसरले. यानंतर 25 मिनिटं हवेतच भरकटलं, अहो इतकंच काय तर त्या गाढ झोपलेल्या वैमानिकांना अलार्म वाजवून जागं केलं गेलं. विमानात 183 प्रवासी होते.
सुदानमध्ये खार्तुमहून इथिओपियातील आदिस अबाबाला चाललेल्या विमानाचे दोन्ही वैमानिक 37 हजार फूट उंचीवर विमान असताना गाढ झोपले व लँडिंग करायला विसरले. त्यामुळे विमान 25 मिनिटे हवेतच भरकटले. अखेर एटीसीने विमानातील अलार्म वाजवून वैमानिकांना झोपेतून जागे केले आणि सुरक्षित लँडिंग करीत 183 प्रवाशांचे प्राण वाचवले. इथिओपियन एअरलाइन्सच्या ईटी 343 या विमानात सोमवारी हा प्रकार घडला. इथिओपियाची राजधानी असलेल्या आदिस अबाबामध्ये लँडिंग करण्याची विमानाची वेळ झाली होती. त्यामुळे एटीसीने सिग्नल देऊन वैमानिकांना अलर्ट केले. मात्र वैमानिक गाढ झोपले होते. वारंवार अलर्ट दिल्यानंतरही एटीसीला विमानातून कोणताच रिस्पॉन्स मिळाला नाही.
वैमानिकांनी ऑटो पायलट मोडवर ठेवलेले विमान विमानतळाच्या क्षेत्रातूनही पुढे निघून गेले. त्यावर एटीसीने इमर्जन्सी लक्षात घेऊन विमानातील ऑटो पायलट मोड बंद केला आणि आतील अलार्म वाजवण्यास सुरुवात केली. त्या अलार्मच्या आवाजाने अखेर वैमानिकांची झोप उडाली व त्यांनी एटीसीशी संपर्क साधला. त्यानंतर विमान माघारी आणून आदिस अबाबाच्या विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले. 37 हजार फूट उंचीवर घडलेल्या या प्रकारादरम्यान जीव मुठीत धरून राहिलेल्या 183 प्रवाशांनी तब्बल 25 मिनिटांनंतर सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान एव्हिएशन डाटा सर्व्हिलान्स सिस्टमने (एडीएस – बी) या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. इथिओपियन एअरलाइन्सचे दोन्ही वैमानिक अत्यंत बेफिकीर वागले असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.