बारामती: आपल्यासमोर एखादा अपघात (Accident) झाल्यावर आपण काय करतो? आपण मदत करतो! आपल्याला असंच शिकवलेलं असतं ना लहानपणापासून की समोरचा संकटात असेल तर मदत करायची. आपल्याकडेही लोकं साधारण तेच करतात. अपघात झाला की मदत करतात. पण जर अपघात झालेली गाडी दारूच्या बाटल्यांची वाहतूक करत असेल तर? मग आपली लोकं मदत करतील की दारूच्या बाटल्या उचलतील? तेच झालंय…बारामतीतून एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होतोय ज्यात एका ट्रॅक्टर आणि छोट्या टेम्पोची धडक होतीये. छोटा टेम्पो दारूच्या बाटल्यांची वाहतूक (Baramati Liquor Tempo Accident) करत असतो. अपघात होतो आणि रस्त्यावर सगळीकडे दारूच्या बाटल्या पडतात. मदत करतील ते लोकं कसले? एक एक जण येतो आणि दारूची बाटली उचलून नेतो.
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर टेम्पो आणि ट्रॅक्टरची धडक झालीये. या टेम्पो आणि ट्रॅक्टरच्या धडकेत टेम्पोचं प्रचंड नुकसान झालंय. हा टेम्पो दारू वाहतूक करत होता. धडकेमुळे दारूच्या बाटल्यांचा खच रस्त्यावर पडला आणि अपघात राहिला बाजूला पण नागरिकांची दारूसाठीच झुंबड! हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. रस्त्याच्या बाजूला खडी टाकल्यानं हा अपघात झाल्याचं दिसून येतंय. यातून रस्त्याच्या कामाकडे ठेकेदारांचं दुर्लक्ष झाल्याचं सुद्धा समोर येतंय. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झालाय, फुकट ते पौष्टिक यावर लोकांचा फार विश्वास आहे.
व्हिडिओत तुम्ही बघू शकता रस्त्यावर दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला आहे. दारू नेणाऱ्या टेम्पोचं प्रचंड नुकसान झालंय. ही व्हिडीओ मधली गर्दी अपघात पाहण्यासाठी नाही, रस्त्यावर पडलेल्या बाटल्या उचलण्यासाठी आहे. जेजुरी मोरगाव रस्त्यावर हा अपघात घडलाय. नागरिक त्या फुकट मिळणाऱ्या बाटल्यांसाठी खास वेळ काढून थांबत आहेत. कुणी आपल्या मित्राला फोन करून त्या बाटल्या उचलायला बोलवत असेल तर नवल वाटायला नको असं हे दृश्य आहे. त्या नुकसान झालेल्या टेम्पोकडे मात्र कुणाचंच लक्ष नाही. तो बिचारा आपला तसाच उभा आहे.