मुंबई : 12 डिसेंबर 2023 | जगभरात असे असंख्य लोक आहेत, ज्यांच्या तोंडाला जेवणाचं नाव ऐकताच पाणी सुटतं. प्रत्येक पदार्थाबद्दल ते उत्सुक असतात. इतकंच नव्हे तर एखादा आवडता पदार्थ चाखण्यासाठी ते दूरदूरपर्यंतचाही प्रवास करतात. अनेकदा तर असेही किस्से पहायला मिळाले, जेव्हा एखादी व्यक्ती त्याचा आवडता पदार्थ खाण्यासाठी विमानप्रवास करून दुसऱ्या देशात गेली असेल. जेवणात असंख्य पदार्थ असले तरी स्ट्रीट फूडची एक वेगळीच मजा असते. भारतातील प्रत्येक राज्यात, शहरात विविध प्रकारचे स्ट्रीट फूड पहायला मिळतात. मात्र त्यात काही अत्यंत विचित्र प्रकारचेही पदार्थ आहेत. हे पदार्थ 2023 या वर्षभरात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे चक्रावतील.
मॅगी पराठा- तुम्ही विविध प्रकारचे पराठे चाखले असतील. पण कधी मॅगी पराठ्याचं नाव ऐकलंय का? किंवा त्याची चव चाखली आहे का? आलू पराठा, मटर पराठा, पनीर पराठा, कोबी पराठा तर सर्वसामान्यपणे खाल्ले जातात. पराठे म्हणताच काहींच्या तोंडाला पाणी सुटतं. पण या वर्षी जून महिन्यात सोशल मीडियावर मॅगी पराठ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. हा पराठा पाहून अनेकांचे डोळे चक्रावले.
गुटखा आइस्क्रीम- आइस्क्रीम आवडत नाही, अशी व्यक्ती क्वचितच असेल. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना आइस्क्रीम खूप आवडते. गेल्या काही वर्षात आइस्क्रीममध्ये बरेच नवीन फ्लेवर्स आले आहेत. जुलै महिन्यात सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक व्यक्ती गुटखा टाकून तव्यावर आइस्क्रीम बनवताना दिसला. या व्हिडीओवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या.
केळं पाणीपुरी- गोलगप्पे किंवा पाणीपुरी हा सर्वांत लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. विविध शहरांमधील गल्ल्या-गल्ल्यांमध्ये पाणीपुरीचे स्टॉल्स पहायला मिळतात. या पाणीपुरीत सहसा बटाटा किंवा वटाणे यांचं मिश्रण वापरलं जातं. मात्र जून महिन्यात व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये चक्क केळ्याची पाणीपुरी पहायला मिळाली होती. या व्हिडीओत एका व्यक्तीने बटाट्याच्या जागी केळं कुस्करून वापरलं होतं. तेच केळं त्याने पाणीपुरीच्या पुरीमध्ये भरून सर्वांना खायला दिलं होतं. अशी विचित्र पाणीपुरी तुम्ही क्वचितच पाहिली असेल.
Hurting the food sentiments of Pani Puri lover’s on the TL
Presenting Banana Chana Pani Puri🙈 pic.twitter.com/961X9wnuLz
— Mohammed Futurewala (@MFuturewala) June 22, 2023
मँगो ऑमलेट- मँगो आणि ऑमलेट हे समीकरणच ऐकायला विचित्र वाटतंय ना? पण एका स्ट्रीट फूडवाल्याने याच अजब समीकरणाने एक पदार्थ बनवला आहे. सुरुवातीला त्याने कच्ची आणि उकडलेली अंडी मिळून ऑमलेट बनवला होता. त्यानंतर त्यात त्याने आमरस मिसळलं. या मँगो ऑमलेटचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.