80 ते 90 च्या दशकात बंदुकीच्या जोरावर नवरदेवाचं अपहरण करून त्याचं लग्न लावून दिलं जायचं. बिहारमधील ही सर्रासपणे घडणारी घटना होती. त्यालाच पकडुआ ब्याह असं नाव दिलं गेलं. त्यानंतर बिहारकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोणच वेगळा झाला. या पकडुआ ब्याहची सुरुवात भूमिहार आणि राजपुत समुदायात अधिक होती. त्यानंतर ही प्रथा सर्वच जातीत रुढ झाली. या दरम्यान, अनेकदा रक्तरंजित संघर्षही झाला. नवरीच्या मनात काय आहे याचा विचार न करता अशा पद्धतीने लग्न लावण्याची प्रथा सुरू झाली. त्यामुळे अनेक मुलींचा कोंडमाराही झाला.
नंतरच्या काळात कायद्याचा धाक, बदललेली सामाजिक आणि राजकीय परिस्थितीनंतर पकडुआ ब्याहला वेसण बसलं. ही प्रथा हळूहळू कमी झाली. पण 2024 मध्ये पुन्हा एकदा अशा प्रकारचा विवाह होण्यास सुरुवात झाली आहे. महसूल कर्मचारी, बीएससी शिक्षकांसहीत अनेक सरकारी कर्मचारी आणि ठेकेदार कुटुंबातील मुलांचा बंदुकीच्या जोरावर विवाह लावून देण्यात आला. त्यामुळे पकडुआ ब्याहची वापसी झाली की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच बिहारमध्ये एक पकडुआ ब्याह झाला. त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. या विवाहाची रीलही व्हायरल झाली आहे.
दुसऱ्या दिवशी जेव्हा वरात परत आली, तेव्हा…
1989 मध्ये बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील रोसरा अनुमंडळाच्या साहियार डीहचे खासगी शिक्षक मनोज कुमार सिंह वरात घेऊन बेगूसराय येथील सीमरियाकडे निघाले. पण जेव्हा वरात लग्नाच्या ठिकाणी पोहोचली तेव्हा काही लोकांनी वरातीत घुसून मुलांची धरपकड केली. त्यातील पाच मुलांना बंदुकीचा धाक दाखवून त्यांचं जबरदस्ती लग्न लावून दिलं. म्हणजे एक वरात गेली अन् सोबत पाच नवरी आल्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा वरात परत आली, तेव्हा नवरीला आणायला गेलेल्या वऱ्हाडी मंडळीसोबत पाच नवऱ्या आल्याचं पाहून गावही बुचकळ्यात पडलं होतं. त्यानंतर त्यांना सर्व प्रकार सांगितला. बंदुकीच्या धाकावर पाच मुलांची लग्न लावली गेली. त्यामुळे पाच नवऱ्यासोबत आल्या. अशा प्रकारे 90च्या दशकात धरून, जबरदस्ती करून आणि प्रसंगी बंदुकीचा धाक दाखवून लग्न लावून देण्याची प्रथा सुरू झाली. त्यालाच पकडुआ ब्याह नाव देण्यात आलं. म्हणजे पकडून लावलेला जबरदस्तीचा विवाह. तेव्हापासून समस्तीपूरमधल्या साहियार डीह गावाला पकडुआ विवाह व्हिलेज म्हटलं जात आहे. त्याची आजही चर्चा होतेच.
ज्यांचं लग्न झालं, त्यांचं नशीब बदललं
गाववाल्यांच्या मते ज्यांचं पकडुआ ब्याहनुसार लग्न झालं त्यांचं नशीब बदललं. 30 वर्षानंतर या गावाचा सर्व्हे करण्यात आला. त्यावेळी वरातीत असलेल्या सुबोध कुमार सिंह यांनी माहिती दिली. सुबोध कुमार सिंह म्हणाले की, “ही पाचही मुलं शिक्षण घेत होते. पण त्यांना नोकरी नव्हती. पण त्यांचं लग्न झालं आणि त्यांना नोकरीही मिळाली” राजीव सिंह, डॉ. सुशील कुमार सिंह या दोघांचा पकडुआ ब्याह झाला होता. त्यांचं या वर्षी निधन झालं. धर्मेंद्र कुमार सिंह आणि सरोज कुमार सिंह यांना नोकरी लागली. पाचव्यालाही नोकरी लागली, पण त्याने आपलं नाव जाहीर करू नये अशी विनंती केली. यावरून पकडुआ ब्याह पद्धत वाईट असली तरी या मुलांचं भलं झाल्याचंही दिसून आलं आहे.