Facebook Twitter Ban | भारतात फेसबुक, ट्विटर बंद होणार? मग नवा पर्याय काय? पाहा नेटकरी काय म्हणतात?

| Updated on: May 25, 2021 | 7:34 PM

केंद्र सरकारने देशातील सर्व सोशल मीडिया कंपन्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी 3 महिन्यांची मुदत दिली होती.

Facebook Twitter Ban | भारतात फेसबुक, ट्विटर बंद होणार? मग नवा पर्याय काय? पाहा नेटकरी काय म्हणतात?
FACEBOOK AND TWITTER BAN
Follow us on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील सर्व सोशल मीडिया कंपन्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले होते. त्यासाठी 3 महिन्यांची मुदत दिली होती. ही मुदत आता 26 मे रोजी म्हणजेच बुधवारी संपणार आहे. याच कारणामुळे नेटकऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. फेसबुक आणि ट्विटरवर (Facebook and Twitter) सध्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. (what will be alternative for Facebook and Twitter know all about social media ban and Ministry of Information Technology new rule)

फेसबुक, ट्विटरवर मीम्स आणि विनोदांचा पाऊस

फेसबुक आणि ट्विटरवर सध्या #IStandWithTwitterIndia, #FacebookBan हे हॅशटॅक ट्रेंडिंगवर आहेत. या हॅशटॅगखाली नेटकरी आपले मत जाहीरपणे मांडतायत. मीम्स तसेच भन्नाट विनोदांनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तसेच सोशल मीडियावर बुधवारपासून बंदी आणली जात असेल तर हे निंदणीय असून व्यक्त होण्यावर बंदी आणणे चुकीचे असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे.

समाजमाध्यमावर मीम्सचा पाऊस

फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम बंद होणार ? चर्चा नेमकी कशामुळे

फेसबुक, ट्विटर तसेच इन्स्टाग्रामसारखी समाजमाध्यमं बंद होणार असे सोशल मीडियावर म्हटले जात आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे सध्या ही चर्चा रंगली आहे. या चर्चेची अजूनतरी निश्चित पुष्टी झालेली नाही. 25 फेब्रुवारी 2021 रोजी भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सोशल मीडिया कंपन्यांना 3 महिन्यांच्या आत काही सूचनांचे पालन करण्याचे आदेश दिले होते, ते आदेश भारत सरकारच्या गॅझेटमध्येही प्रकाशित केले गेले होते. या आदेशानुसार, सोशल मीडिया कंपन्यांना भारतात अनुपालन अधिकारी, नोडल अधिकारी नियुक्त करण्यास सांगितले गेले होते. तसेच हे सर्व अधिकारी भारतात असणे आवश्यक आहे. या आदेशात असेही म्हटले होते की, सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवर किंवा मोबाईल अ‍ॅपवर फिजिकल कॉन्टेक्स पर्सनची माहिती द्यावी लागेल. या नियमांचे पालन केले नाही तर समाजमाध्यमांवर योग्य ती कारवाई केंद्र सरकार करु शकते. याच कारणामुळे सध्या ही चर्चा रंगली आहे.

फेसबुक, ट्विटर बंद झाल्यानंतर काय ?

समाजमध्यमे बंद होणार अशी चर्चा सध्या रंगली आहे. ही चर्चा फक्त सोशल मीडियावर असल्यामुळे त्याच्यात किती सत्यता आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. केंद्र सरकारने सांगितलेले नियम पाळण्याची अंतिम मुदत 26 मे रोजी पूर्ण होणार असल्यामुळे या चर्चेला जास्तच बळ मिळाले. या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेली डेडलाईन संपत आल्यामुळे फेसबुकने याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. फेसबुकने आज म्हटले आहे की, कंटेंट रेग्युलेट करण्यासाठी सरकारच्या नवीन नियमांचे पालन करण्याची त्यांची इच्छा आहे. फेसबुकच्या या प्रतिक्रियेमुळे केंद्र सरकार काय भूमिका घेणार हे आता पाहावे लागणार आहे.

ट्विटर बंदच्या चर्चेमुळे Koo पुन्हा चर्चेत 

सध्या सोशल मीडियावर फेसबुकसोबतच ट्विटरवरसुद्धा बंदी आणली जाईल असे म्हटले जातेय. त्यामुळे ट्विटर बंद झाल्यानंतर पुढे काय ? दुसरे कोणते समाजमाध्यम वापरात येईल याचा शोध घेणे नेटकऱ्यांनी सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर सध्या Koo हे काही दिवसांपूर्वी सुरु झालेले समाजमाध्यम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Koo ने सरकारच्या नियमांचे पालन करण्यास सुरवात केली आहे. Koo ने जर नियम पाळणे सुरु केले असेल तर त्यावर बंदी आणण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे ट्विटरवर जर बंदी आणण्यात आली तर मायक्रोब्लॉगिंगसाठी Koo या समाजमाध्यमाचा नेटकरी वापर करण्याची शक्यता आहे. ट्विटरसाठी हा एक मोठा पर्याय ठरू शकेल, असे म्हटले जात आहे.

इतर बातम्या :

…अन्यथा येत्या 2 दिवसांत Facebook, Twitter आणि Instagram बंद होणार?, सरकारचे आदेश धूळखात

नव्या डिजिटल नियमांचे पालन करु; केंद्र सरकारसमोर Facebook ची माघार

(what will be alternative for Facebook and Twitter know all about social media ban and Ministry of Information Technology new rule)