नवी दिल्ली : पर्यावरणात वैविध्यपूर्ण प्रजातींचा अधिवास आढळतो. प्रजातींची शरीरसंरचना,जीवनप्रणाली तसेच अधिवासांचे अंतरंग उलगडताना जीवशास्त्रज्ञांच्या अभ्यासाची कसोटी लागते. आॉस्ट्रिलयीन जीवशास्त्रज्ञांनी नव्या प्रजातीचे आतापर्यंत जगासमोर न आलेलं वैज्ञानिक सत्य उजेडात आणलं आहे. जगातील सर्वाधिक पाय असलेल्या जैविक प्रजातीचा शोध लावण्यात यश आले आहे. आॉस्ट्रिलियाच्या दक्षिण प्रांतात तब्बल 1,306 पाय असलेली प्रजाती जगासमोर आली आहे. ‘युमिलीप्स परसेफोन’ असे या प्रजातीला वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे.
प्रजातीच्या उकलीची खाणी मोठी रंजक आहे. एका खाण कंपनीने आपला प्रस्तावित प्रकल्प उभारणीच्या ठिकाणी असलेल्या जमिनीवरील तसेच भूगर्भातील प्रजीतींचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी संशोधकावर सोपविली होती. यावेळी आपल्या टीमसह नमुन्यांचे संकलन करत असताना दहा सेंटीमीटर लांबीचा सहस्त्रपाद (मिलीपेड) भूगर्भाच्या 60 मीटर आत आढळून आला. टीममधील वरिष्ठ शास्त्रज्ञ जेन मॕकरे यांनी त्रिकोणाकृती मुख संरचना असलेल्या प्रजातीला सिफ्नोटीडे समूहात वर्गीकृत केले.
हजारो पायांसह लांब,जाड आणि पसरट शरीर वैशिष्ट्यकृत असल्याचे जाणवलं. कॕलिफॉर्नियन लॕक्मे शोधनिबंधात आतापर्यंत 750 पायांच्या सहस्त्रपादाची नोंद आढळून आली होती. त्यावेळी जगात एक हजार पायांपेक्षा अधिक सहस्त्रपाद अस्तित्वात नसल्याचे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले होते. मात्र, आॉस्ट्रेलियन संशोधकांच्या नव्या अभ्यासातून सर्वाधिक पायांची प्रजाती वैज्ञानिक पटलावर आली आहे.
जनुकीय अभ्यासानुसार, सहस्त्रपाद (मिलीपेड) मध्ये मोठा विस्तार आढळून येतो. भूगर्भात जिवंत राहण्यासाठी नैसर्गिक अनुकूलन याद्वारे साधले जात असल्याचे निरीक्षण जीवशास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. बहुविध पायाच्या शरीरामुळे छोट्याश्या जागेतून आणि सच्छिद्र मार्ग काढण्यासाठी फायदा होतो. दरम्यान, अशाप्रकारची केवळ मतमतांतरे आहेत. अद्याप निष्कर्षापर्यंत पोहोचलो नसल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे.
सहस्त्रपाद म्हणजे हजार पाय असलेला. आतापर्यंत 750 पाय असलेली प्रजाती सर्वाधिक पायांची गणली गेली होती. मात्र, शास्त्रज्ञांच्या नवसंशोधनामुळे ‘सहस्त्रपाद’ शब्दाचा अर्थ प्रत्यक्षात आला आहे.