‘Coldplay कॉन्सर्टला जाणार नाही, तिकिटही कोणाला देणार नाही..’; युट्यूबरवर भडकले चाहते

| Updated on: Sep 24, 2024 | 12:32 PM

कोल्डप्ले या ब्रिटिश रॉक बँडचा कॉन्सर्ट जानेवारी 2025 मध्ये भारतात होणार आहे. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये हा कॉन्सर्ट होणार असून त्याची सर्व तिकिटं अवघ्या काही मिनिटांत विकली गेली आहेत.

Coldplay कॉन्सर्टला जाणार नाही, तिकिटही कोणाला देणार नाही..; युट्यूबरवर भडकले चाहते
Coldplay
Image Credit source: Instagram
Follow us on

सध्या भारतात सर्वाधिक खुश असलेली व्यक्ती कोणती असा प्रश्न विचारला तर मुंबईत होणाऱ्या ‘कोल्डप्ले’च्या (Coldplay) कॉन्सर्टचं तिकिट मिळवणारी, असं उत्तर मिळाल्यास चकीत होऊ नका. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या ब्रिटीश रॉक बँडची तुफान चर्चा आहे. जगभरात असंख्य चाहते असलेला हा रॉक बँड तब्बल आठ वर्षांनंतर भारतात पुन्हा एकदा परफॉर्म करण्यासाठी येणार आहे. जानेवारी 2025 मध्ये नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये कोल्डप्लेचा हा कॉन्सर्ट पार पडणार असून नुकतीच त्याची सर्व तिकिटं अवघ्या काही मिनिटांत विकली गेली आहे. जवळपास दीड लाखांपर्यंतची ही तिकिटं काही मिनिटांत विकली गेली म्हणजे यावरूनच या रॉक बँडची किती क्रेझ आहे, हे लक्षात येतं. ज्यांना ही तिकिटं मिळू शकली नाहीत, ते सध्या विविध रिल्स, मीम्स आणि व्हिडीओंद्वारे सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच एका युट्यूबरने अशी काही पोस्ट लिहिली आहे, जी वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे.

किमान एकतरी तिकिट मिळावं यासाठी असंख्य चाहते आटोकाट प्रयत्न करताना दिल्लीतल्या लक्ष्य चौधरी या युट्यूबरला चार-चार तिकिटं मिळाली आहेत. तीसुद्धा स्टेजच्या अगदी जवळची प्राइम तिकिटं. यानंतर लक्ष्यने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलेली पोस्ट वाचून अनेकजण भडकले आहेत. कोल्डप्लेच्या तिकिटांचा स्क्रीनशॉट पोस्ट करत लक्ष्यने लिहिलं, ‘मला कोल्डप्लेच्या कॉन्सर्टने काहीच फरक पडत नाही. मी त्यांचा चाहताही नाही आणि मी त्या कॉन्सर्टलाही जाणार नाही. तरीसुद्धा मला ही तिकिटं मिळाली आहेत. मी ही तिकिटं कोणाला देणार नाही आणि स्वत:ही जाणार नाही. रांगेतच उभे राहा.’ लक्ष्यच्या पोस्टमधील हा उद्दामपणा पाहून कोल्डप्लेचे चाहते चांगलेच भडकले आहेत. अनेकांनी त्याला सोशल मीडियावर टॅग करत जोरदार टीका केली.

हे सुद्धा वाचा

‘अशा लोक कोणत्याच गोष्टीच्या लायकीची नसतात’, असं एकाने लिहिलं. तर ‘मला तर हा मुलगा मानसिकदृष्ट्याच ठीक नाही वाटत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘यावरून तुमचं संगोपन कसं झालं ते समजतं. इतरांच्या जखमेवर अशा पद्धतीने मीठ चोळून काय मिळालं’, असा सवाल एका युजरने केला. इतकंच नव्हे तर अनेकांनी लक्ष्यला इन्स्टाग्रामवर अनफॉलो करण्यास सुरुवात केली. अखेर ही तीव्र नाराजी पाहून लक्ष्यने पुन्हा एक पोस्ट लिहिली. त्यात त्याने बारा लाख फॉलोअर्स गमावल्याचा खुलासा केला. “जर मी कॉन्सर्टला न जाण्याचा निर्णय घेत असेन तर माझ्या टीकाकारांना काय समस्या आहे? अर्थातच मी इतका मूर्ख नाही की चार तिकिटं विकत घेऊन या कॉन्सर्टला न जाण्याचा विचार करेन. मी UFC चा चाहता आहे. भारतात UFC होणार आहे. त्यात एक लाखाची बसण्याची क्षमता आहे. जर एखाद्याने सर्व एक लाख तिकिटं विकत घेऊन ती फाडली तरी मला काहीच वाटणार नाही. मी काहीच प्रतिक्रिया देणार नाही. कारण तो त्या व्यक्तीचा पैसा आहे. त्या पैशाने ते काहीही करू शकतात”, असं त्याने म्हटलंय. ‘तिकिटांवर 50-60 हजार रुपये खर्च करून त्या कॉन्सर्ट न जाण्यात काहीच तथ्य नाही. याला काहीच अर्थ नाही’, असंही त्याने पुढे लिहिलंय.