मुंबई: झोमॅटो डिलिव्हरी वाल्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी AI चे काही फोटो व्हायरल झाले होते ज्यात डिलिव्हरी करणारे पावसात मजा घेताना दिसत होते. अनेकदा त्यांचे भावुक करणारे व्हिडीओ देखील व्हायरल होतात. कधी एखादा डिलिव्हरी बॉय आपल्या पत्नीला घेऊन आपलं काम करत असतो. कधी आपल्या मुलांना घेऊन फिरत असतो. परिस्थिती वाईट असून देखील ही लोकं लढायचं थांबत नाही. या व्हायरल व्हिडीओ, फोटोंमुळे आपल्याला देखील प्रेरणा मिळते.
या व्हिडीओ मध्ये एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय आपल्या दोन मुलांना घेऊन काम करताना दिसतोय. तो जिथे जिथे डिलिव्हरी करायला जातो तिथे तो आपल्या या 2 मुलांना घेऊन जाताना दिसतोय. हा व्हिडीओ अतिशय भावुक करणारा आहे. व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट करताना युजरने लिहिले, “हे बघून मला खूप प्रेरणा मिळाली. झोमॅटो डिलिव्हरी बॉय आपल्या दोन्ही मुलांसोबत दिवसभर त्याचं काम करतो. जर माणसाने ठरवलं तर माणूस काहीही करू शकतो.”
असे व्हिडीओ पाहिले की आपल्याला आपल्या अडचणी देखील क्षुल्लक वाटतात. झोमॅटो बॉयचा हा व्हिडीओ हृदयाला स्पर्श करून जातो. ही क्लिप इतकी व्हायरल झाली की झोमॅटोने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत त्या व्यक्तीला मदतीचा हात पुढे केला. झोमॅटोने कमेंट बॉक्समध्ये लिहिलं आहे की, “कृपया ऑर्डर डिटेल्स प्रायव्हेट मेसेजमध्ये शेअर करा जेणेकरून आम्ही डिलिव्हरी पार्टनरपर्यंत पोहोचू आणि त्याला मदत करू शकू. एका युजरने कमेंट केली की, “अशा डिलिव्हरी एजंटांना मदत केल्याबद्दल आणि त्यांना पैसे कमवण्यासाठी प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल झोमॅटोचे आभार.” “परिस्थिती कशीही असो, आपण कठोर परिश्रम केले पाहिजेत”, असे एका तिसऱ्या युजरने लिहिले आहे.