नवी दिल्ली: आयुष्यातील उतारवयात निवृत्ती वेतन हा ज्येष्ठांसाठी प्रमुख आर्थिक आधार मानला जातो. मात्र, खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शनची (Pension) सुविधा उपलब्ध नसते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून अनेक निवृत्तीवेतन योजना (Pension Scheme) चालवल्या जातात. यापैकीच एक म्हणजे अटल पेन्शन योजना. या योजनेत तुम्ही महिन्याला 210 रुपये गुंतवून म्हातारपणी दर महिन्याला पाच हजारांची पेन्शन मिळवू शकता.
तुम्ही वयाची साठी ओलांडल्यानंतर तुम्हाला महिन्याला पेन्शन सुरु होईल. यामध्ये तुमच्या गुंतवणुकीप्रमाणे 1000 ते 5000 रुपयांची पेन्शन दिली जाईल. 18 ते 40 वयोगटाच्या व्यक्ती या योजनेत पैसे गुंतवू शकतात.
योजनेत गुंतवणूक करण्यासाठी बँकेत बचत खाते, आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर या गोष्टी गरजेच्या आहेत. या योजनेत तुम्ही किमान 20 वर्षे गुंतवणूक करणे गरजेचे आहे. तुम्ही मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही पद्धतीने प्रीमिअम जमा करु शकता. तुमच्या खात्यातून नियोजित तारखेला पैसे कापले जातील. म्हातारपणी तुम्हाला किती पेन्शन हवी यावर प्रीमियमचा हप्ता ठरेल. तसेच यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंतची करमाफी मिळेल.
* कोणत्याही बँकेत जाऊन तुम्ही अटल पेन्शन स्कीमचे खाते सुरु करु शकता.
* अटल पेन्शन योजनेचा फॉर्म ऑनलाईन डाऊनलोडही करता येईल.
* हा फॉर्म तुमच्या नजीकच्या बँक शाखेत द्यावा लागेल.
* या फॉर्मसोबत तुम्ही मोबाईल नंबर आणि आधार कार्डाची छायांकित प्रत देणे गरजेचे आहे.
* तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर मेसेज येईल.
कोव्हिड 19 महामारीच्या संकटाच्या (COVID-19 Pandemic) काळात अटल पेन्शन योजना (AYP) आणि नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) अंतर्गत खातेधारकांची संख्या 22 टक्क्यांनी वाढून 4.15 कोटी झाली आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) च्या मते, फेब्रुवारी 2021 पर्यंत विविध योजनांमधील खातेदारांची संख्या फेब्रुवारी 2020 मध्ये 3.43 कोटींवरून वाढून 4.14 कोटी झाली आहे, वार्षिक आधारावर 21.85 टक्क्यांनी वाढ दिसून आली होती.
संबंधित बातम्या :
तरुण म्हणून तुम्ही योग्य मार्गावर आहात का? भारतातील ‘या’ पहिल्या अनोख्या प्रश्नावलीतून जाणून घ्या
मोठं यश! आता हे सॉफ्टवेअर सांगणार कोणत्या रुग्णाला व्हेंटीलेटर आणि आयसीयूची गरज
आता आठवड्यात फक्त 4 दिवस काम आणि 3 दिवस सुट्टी, काय आहेत नवे नियम, कधीपासून लागू होणार?