ऑनलाईन कर्ज (Online Loan) घेताय, तर थोडी सावधगिरी बाळगा. या डिजिटल युगात बँकिंगचे काम बोटांवरच होते. आपण एखादे बटण दाबताच, तेथे ऑनलाइन पेमेंट किंवा व्यवहार होतो. चारचाकी कर्ज, गृहकर्ज, उच्च शिक्षण कर्ज, व्यवसाय किंवा वैयक्तिक कर्ज अशा कर्जाची गरज भासली, तरी हे काम काही मिनिटांतच होते. त्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. घरी बसून कर्जासाठी अर्ज करतात आणि पैसे खात्यात येतात. पण यात जोखीमही आहे. हा धोका वेळीच ओळखला नाहीत तर त्याचा मोठा आर्थिक फटका तुम्हाला बसू शकतो. बँकांच्या नावाने अनेक बनावट पोर्टल आणि कर्ज देणारे ॲप्स कार्यरत आहेत. बनावट पोर्टल (Duplicate Portal) हुबेहुब तुमच्या बँकेच्या पोर्टलसारखेच असते. या भामट्यासोबत ही ऑनलाईन मिटींग तुमच्यासाठी घातक ठरु शकते. तुम्ही एकदा त्यांच्या जाळ्यात अडकलात की तुमच्याकडून कर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याच्या तसेच कर्ज मंजुरीसाठी आगाऊ रक्कमेच्या नावाखाली तुमच्याकडून रक्कम हडपली जाते. त्यामुळे कर्जासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याअगोदर ते खऱंच तुमच्या बँकेचे पोर्टल आहे का याची खात्री करा. बोगस संकेतस्थळ ओळखण्यासाठी ब्राउजरच्या ॲड्रेस बारमध्ये (Address Bar) नेहमी बँकेचा यूआरएल टाइप करा.
ऑनलाइन कर्जासाठी अर्ज करताना सायबर फसवणुकीच्या अशा घटना लक्षात ठेवा. सायबर भामटे ग्राहकांच्या खात्यातून रक्कम उकळतात. त्यांची फसवणूक करतात. नकली अथवा हुबेहुब दिसणा-या ॲपद्वारे तुमची लूट करतात. त्यामुळे ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी सजग राहणे गरजचे आहे.
सार्वजनिक वायफाय टाळा
सार्वजनिक ठिकाणचे वाय-फाय किंवा शेअर्ड कम्प्युटरचा वापर करताना ऑनलाईन कर्जाचा अर्ज शक्यतोवर करु नका. याठिकाणी तुमचे बँक डिटेल्स घेऊन तुमचे खाते हँक होऊ शकते. तसेच शेअर केलेल्या कम्प्युटरचे ऑटो कॉम्पलेट फंक्शन चालू असेल तर हॅकर्स ईमेल आयडीद्वारे तुमच्या सिस्टिममधील माहिती चोरू शकतात. म्हणून जेव्हा तुम्ही शेअर केलेला कॉम्प्युटर वापरता तेव्हा ब्राउझिंग हिस्ट्री, कॅचे आणि टेम्प फाईल नंतर डिलीट करा. हीच परिस्थिती सार्वजनिक वायफायबाबतही होऊ शकते. या वायफायचा वापर करून स्मार्टफोनवरून ऑनलाइन कर्जासाठी कधीही अर्ज करू नका.
केवळ सुरक्षित पोर्टल किंवा अधिकृत ॲपचा वापर करा
बँकांचे अनेक बनावट पोर्टल आणि कर्ज देणारे ॲप्स तयार आहेत. या बनावट पोर्टलद्वारे तुमची फसवणूक केली जाते. कर्जासाठी अर्ज केल्यास आधी सदर बँकेचे संकेतस्थळ खरे आहे की खोटे याची तपासणी करा. हा धोका टाळण्यासाठी ब्राउजरच्या ॲड्रेस बारमध्ये नेहमी बँकेचा यूआरएल टाइप करा. बँकेच्या संकेतस्थळावर पॅडलॉक आणि वैध एसएसएल प्रमाणपत्र आहे की नाही याची खात्री करा. ईमेल किंवा मेसेजवरील कोणत्याही लिंकवर क्लिक करून कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नका.
ऑनलाइन पेमेंट करताना घ्या काळजी
ऑनलाइन कर्ज घेताना काही महत्त्वाची कागदपत्रंही अपलोड करावी लागतात. पॅनकार्ड, आधार, बँक स्टेटमेंट इ. या कागदपत्रांमध्ये अनेक महत्त्वाची माहिती असते. ती बँकेच्या योग्य साइटवर अपलोड न केल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. कर्जाचा अर्ज हॅक झाल्यास तुमचा डेटा चोरी होऊ शकतो. या आधारे आपल्या आवश्यक माहितीत फेरफार करून फसवणूक केली जाऊ शकते. कर्ज घेण्यासाठी प्रक्रिया शुल्क भरण्यापूर्वी ऑनलाइन ॲड्रेस बरोबर आहे का, हे एकदा तपासून पाहा.
फेक फोन कॉल्सपासून सावध राहा
आजकाल कर्जाच्या नावाखाली अनेक फेक फोन कॉल्स केल्या जातात. तुम्हाला कर्ज देण्याच्या नावाखाली तुमची वैयक्तिक माहिती घेण्यात येते. आधार आणि पॅनकार्डची माहिती लीक झाल्यास तुमच्या खात्याला धोका निर्माण होऊ शकतो. फोन कॉलवर ओटीपी ची विचारणा झाल्यास तात्काळ सजग व्हा आणि यासंबंधीची माहिती सांगू नका.
ईमेल, फोन नंबर बँकेकडे नोंदवा
कृपया आपला ईमेल आयडी आणि फोन नंबर बँकेत नोंदवा. जर तुमच्या बँक खात्यासोबत एखादी ॲक्टिव्हिटी असेल तर तुम्हाला याविषयीचा संदेश लागलीच मिळेल. बँकेत तुम्ही अशी नोंदणी केली असेल तर आपण एखादा व्यवहार देखील अवरोधित करू शकता. यामुळे तुमची सुरक्षितता कायम राहील. तुमच्या बँकेचा
पिन आणि पासवर्ड कोणासोबतही शेअर करु नका.