रशिया-युक्रेन युद्ध (Russia Ukraine Crisis), अमेरिकेतील महागाई आणि फेडच्या व्याजदर वाढीचा थेट परिणाम शेअर बाजारातील तुमच्या डिमॅट खात्यावर दिसून आला असेल. तुमचा पैसा खात्यातून झरझर कमी झाला असेल. आणि अर्थातच मुदत ठेवींवर तेच कमी झालेले व्याज मिळत असेल. पण तरीही चांगल्या परताव्याची अपेक्षा करता येईल, अशी एक संधी आहे. ही संधी आहे ईपीएफ (EPF) अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये. यंदा ही तुम्हाला तुमच्या ईपीएफमध्ये जमा झालेल्या रक्कमेवर 8.5 टक्के व्याजदर (Intrest Rate) मिळू शकेल, अशी अपेक्षा आहे. अनिश्चिततेच्या या काळात तशी ही चांगली बातमी म्हणावी लागेल, नाही का? कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेत (ईपीएफओ) केंद्रीय विश्वस्त मंडळ (CBT) सर्व महत्त्वाचे निर्णय घेते. सीबीटीची बैठक 11-12 मार्च रोजी होणार आहे. याच बैठकीत चालू आर्थिक वर्षातील व्याजदराबाबत निर्णय घेतला जाणार आहे. यावर्षी ईपीएफ मधील रक्कमेवर कोणता व्याजदर दिला जावा यांचा निर्णय घेतला जाणार आहे.
तेजीच्या बाजाराचा सभासदांना फायदा
आता यंदाही ईपीएफवर ८.५ टक्के व्याजदराची अपेक्षा का ठेवता येईल, या मुद्द्यावर येऊ यात. तर त्याआधारे ही किमया साधली जाणार आहे ती शेअर बाजारावर अवलंबून आहे. गेल्या दीड महिन्यापासून बाजार रडतपडत सुरू असला तरी वर्षभर बाजार तेजीच्या घोड्यावर स्वार होता. याचा फायदा ईपीएफओलाही होणार आहे. ईपीएफओही शेअर बाजारात गुंतवणूक करते, हे तुम्हाला माहीत आहे. या गुंतवणुकीवर ईपीएफओने भरपूर कमाई केली आहे. यंदा ईपीएफओला तुम्हाला रिटर्न देण्यासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी ईटीएफ युनिटची विक्री करावी लागणार आहे. मार्च 2020-21 मध्ये ईपीएफओने ईटीएफ विकून 10,130 कोटी रुपये जमा केले होते. त्यापैकी 4,073 कोटी रुपये भांडवली नफ्याचे होते. आता यंदा ‘ईपीएफओ’ला कमी ईटीएफ युनिटची विक्री करावी लागणार आहे. मार्च 2021 पर्यंत ईपीएफओने ईटीएफमध्येच एक लाख 37 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली होती.
FDO पेक्षा EPF ला चांगला परतावा
म्हणजे ईपीएफओ सध्या कमाईच्या शिखरावर आहे. तर मग सभासदांना ही ‘बहती गंगा मे हात धो लो’ असं वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात ईपीएफ वर 8.5 टक्के व्याज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 8.5 टक्के व्याजाचा अंदाज बांधणे यंदा अवघड नाही.
हेही वाचा:
बाजारात चैतन्य परतले; मुंबई निर्देशांकांने घेतली 1552 अंकांची उसळी तर निफ्टीमध्ये 411 अंकांची तेजी
अमेरिकेची शिष्टाई आली कामी; UAE ने उत्पादन वाढीच्या संकेतांनी खनिज तेलाच्या किंमती घसरल्या