नवी दिल्ली : ऐन दिवाळीत (Diwali) आता प्लॅटफॉर्मचे तिकीट (Platform Ticket) महागले आहे. त्यामुळे तुम्ही जर नातेवाईकांना, आप्तेष्टांना अथवा मित्रांना रेल्वे स्टेशनवर (Railway Station) जात असाल तर या ज्यादा तिकीटाचा भूर्दंड तुम्हाला बसू शकतो. अथवा तिकीट दर ऐकून तुम्हाला स्वकियांना रेल्वे स्टेशन बाहेरुनच बाय बाय करावे लागू शकते.
मध्य रेल्वेने (Central Railway) दिवाळी सणानिमित्त रेल्वे स्थानकावरील गर्दी नियंत्रणासाठी ही शक्कल लढवली आहे. प्रवाशांसोबत त्यांचे नातेवाईक, मित्रही स्थानकात एकच गर्दी करत असल्याने तिकीट दर वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वेने काही मोठ्या रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर वाढीचा निर्णय घेतला आहे. नवीन किंमत आजपासून लागू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवश तुम्हाला जर रेल्वे स्थानकावर जायचे काम पडले तर तिकीटासाठी जादा रक्कम मोजावी लागेल.
सणाच्या काळात रेल्वे स्थानकावरील गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी शनिवारपासून मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीटाची किंमत 10 रुपयांहून 50 रुपये करण्यात आली आहे. या सणाच्या काळातच ही वाढीव किंमत असेल. कायमस्वरुपी या किंमत नसतील.
मध्य रेल्वेने शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल या स्थानकावर ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.
या सहा स्थानकावर लांब पल्ल्याच्या रेल्वेंचा राबता असतो. सध्या सणाच्या काळात या स्थानकावर सर्वाधिक गर्दी असते. गर्दी नियंत्रणासाठी प्लॅटफॉर्म तिकीट दर वृद्धी करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत ही दरवाढ लागू असेल.