नवी दिल्ली | 16 सप्टेंबर 2023 : अजूनही तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट (Rs 2000 note) आहे का? तर तुमच्याकडे आता कमी कालावधी उरला आहे. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा बदलाव्या लागणार आहे. या नोटा बँकेत जमा करण्याची (Rs 2000 note return) तारीख यानंतर वाढविण्यात येणार नाही. त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेने यावर्षी मे महिन्यात 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून माघारी बोलविण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर 23 मे 2023 रोजी नोटा परत घेण्याची कसरत सुरु झाली. 2000 रुपयांच्या नोटांचे बाजारातील मूल्य संपणार नाही, पण त्या चलनात वापरण्यात येणार नाही, हे स्पष्ट आहे.
जवळपास 93 टक्के नोटा आल्या परत
भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा परत मागविल्यानंतर त्याला प्रतिसाद मिळाला. 31 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत आरबीआयकडे 93 टक्के नोटा माघारी आल्या आहेत. केवळ 7 टक्के नोटा बाजारात आहेत. केंद्रीय बँकेने ज्या लोकांनी आतापर्यंत 2000 रुपयांच्या नोटा परत केल्या नाही. त्यांना त्या परत करण्याचे आवाहन केले आहे. ई-कॉमर्स कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी कॅश ऑन डिलिव्हरी ऑर्डरवर 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद केले आहे.
एका दिवशी बदला इतक्या नोटा
आरबीआयच्या गाईडलाईननुसार, कोणत्याही व्यक्तीला 2000 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20,000 रुपये बदलविता येतील. त्याच्याकडे कोणतीही विचारपूस न करता नोट बदलवून देण्यात येतील. एका दिवशी 20,000 रुपयांपर्यंत नोट बदलता येतील.
व्यावसायिक केंद्र पण मदतीला
बँकांच्या व्यावसायिक ग्राहक केंद्रात किती नोटा बदलता येतील, असा काहींचा प्रश्न आहे. तर या बिझनेस करस्पॉन्डेंट सेंटरवर खातेदाराला 4000 रुपयांपर्यंत नोटा बदलता येतात. कमी नोटा असतील तर बँकेत जाण्याची गरज नाही.
खाते नसताना बदलवा नोटा
बँकेचे खाते नसेल तरीही तुम्हाला 2000 रुपयांच्या नोटा बदलवून मिळतील. तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. एका दिवशी 20,000 रुपयांच्या नोटा बदलवता येतील. त्यामुळे नोटा उरल्या असतील तर झटपट बलून घ्या.
सध्या व्यवहारात 0.24 लाख कोटी नोटा
बँकांच्या आकड्यानुसार, 31 ऑगस्ट, 2023 रोजीपर्यंत 2000 रुपयांच्या नोटा परत करण्यात आल्या आहेत. त्यांचे एकूण मूल्य 3.32 लाख कोटी रुपये आहे. सध्या व्यवहारात 0.24 लाख कोटी मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 मे रोजी 2,000 रुपयांच्या नोटा माघारी बोलविण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने 2016 मध्ये 500 आणि 1,000 रुपयांची नोटाबंदी करण्यात आली होती. त्यानंतर 2,000 रुपयांची नोटी व्यवहारात सादर करण्यात आली. काळेधनाविरोधात कारवाईसाठी ही नोटबंदी करण्यात आली होती.