मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्यानंतरही भारतीय कंपन्यांनी आपली कामगिरी कायम राखलीय. एक सर्वेतील आकडेवारीनुसार, भारतीय कंपन्यांनी कोरोनामुळे आर्थिक फटका बसलेला असताना देखील यंदा कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरासरी 8.8 टक्के वाढ केलीय. ही वेतनवाढ पुढील वर्षी म्हणजे 2022 मध्ये 9.4 टक्के इतकी असेल.
Aon ने मंगळवारी 26 वा वार्षिक वेतनवाढ सर्वे जारी केला. यानुसार 2022 मधील आर्थिक वाढीबाबत बहुतांश कंपन्या आशावादी आहेत. पुढीलवर्षी 98.9 टक्के कंपन्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करतील. यंदा म्हणजेच 2021 मध्ये 97.5 कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केलीय. सर्वेत म्हटलं आहे की वेगवेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये आर्थिक घडी पुन्हा सुस्थितीत येण्याबाबत सकारात्मकता आहे. 2021-22 मधील वेतनवाढ 2018-19 च्या स्तरावर पोहचेल अशीही आशा अनेक कंपन्यांना आहे.
एऑनचे भागदार रूपक चौधरी म्हणाले, “हे आर्थिक आरोग्य आणि अर्थव्यवस्थेतील वाढीचं लक्षण आहे. गोष्टी सुरळीत होत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. 2020 मध्ये वेतनवाढ 6.1 टक्को होती. 2021 मध्ये ही वेतनावाढ 8.8 टक्के आणि 2022 मध्ये 9.4 टक्क्यावर पोहचण्याची अपेक्षा आहे. ही वाढ 2018 आणि 2019 च्या कोरोनापूर्व काळाइतकी आहे.”
सर्वेत कोरोना नंतरच्या काळात कंपन्यांकडून डिजीटल टॅलेंटला मागणी असल्याचंही सांगण्यात आलंय. अनेक कंपन्यांनी आपलं काम ऑनलाईन/डिजीटल रुपात करण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे यासाठीचं आवश्यक टॅलेंट मिळवण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाल्याचाही दावा सर्वेत करण्यात आलाय. यामुळे वेतनाची तरतूदही वाढत आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरी बदलणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झालीय.
अनेक पारंपारिक आणि अपारंपारिक कंपन्या डिजीटल क्षमतांमध्ये गुंतवणुकीवर भर देत आहेत. जेणेकरुन सध्याच्या डिजीटल युगातील प्रगतीचा वेग त्यांनाही घेता येईल, असंही चौधरी यांनी नमूद केलं.