मुंबई : पुण्यात (Pune) आयटी कंपनीमध्ये (IT company) काम करणाऱ्या राजेंद्रनं गेल्या पाच सहा वर्षात चांगली बचत (Savings) केली होती. मात्र, एके दिवशी रस्ते अपघातात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. अवघ्या एकाच वर्षापूर्वी राजेंद्रचं लग्न झालं होतं. या दुर्घटनेनंतर त्याची पत्नी ऋतुजावर मोठं संकट ओढावलं. काही दिवसानंतर त्याच्या कुटुंबातील बँक खातं आणि गुंतवणुकीची कागदपत्रे पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. राजेंद्रनं त्याचा मित्र दीपकची नॉमिनी म्हणून नोंद केलेली होती हे कागदपत्रावरून दिसून आले. दीपक सध्या अमेरिकेतील एका आयटी कंपनीत काम करतोय. पतीच्या मृत्यूच्या धक्यातून सावरल्यानंतर ऋतुजानं दीपकशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो फोन उचलत नव्हता. ई-मेललाही उत्तर देत नव्हता. पतीच्या निधनानंतर दु:खी असलेली ऋतुजा आणखी अडचणीत आली. कुटुंबात आर्थिक तंगी जाणवू लागली. वेळच्या वेळी भाडं न दिल्यामुळे फ्लॅटच्या मालकानं घर सोडण्यासाठी अल्टिमेटम दिला. ही गोष्ट फक्त ऋतुजाची नाही. मोठ्याप्रमाणात लग्नाच्या अगोदर अनेक जण संपत्ती आणि इतर गुंतवणुकीत कोणाचीही नॉमिनी म्हणून नोंद करतात. मात्र, बरेच जण लग्नानंतर नॉमिनी अपडेट करत नाहीत. नंतर एखादी दुर्घटना घडल्यास कुटुंबाला नुकसान सोसावं लागतं.
सध्याच्या जगात पैसा सर्वकाही नाही, मात्र, पैशाला पर्यायही नाही. त्यामुळे पैशाचे विशेष महत्व आहे. अशातच कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात वाईट वेळ कधी येईल, याची कोणालाच माहिती नसते. पळापळीच्या आयुष्यात कोणासोबत काय होईल याची काहीच शाश्वती नाही. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळतो. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नीला सर्वात जास्त संकटाचा सामना करावा लागतो.सध्या अशाच अवघड परिस्थितीचा सामना ऋतुजाला करावा लागत आहे.
पतीच्या मृत्यूपश्चात पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी गुंतवणूक केलेली नसल्यास किंवा संपत्ती नसल्यास तर संकट आणखी गंभीर होतं. यासाठी लग्नानंतर महिलांनी त्यांच्या जोडीदाराला गुंतवणुकीसाठी प्रेरणा दिल्यास संकटाची वेळ कोणावरही येणार नाही. मात्र, गुंतवणूक करताना उत्पन्नाच्या प्रमाणातच गुंतवणूक करा. अशावेळी पतीनेही संपत्ती, विमा पॉलीसी, म्युच्युअल फंड आणि सर्व प्रकाराच्या गुंतवणुकीत नॉमिनी म्हणून पत्नीची नोंद करावी. तुमच्या या पुढाकारामुळे जोडीदाराच्या मनातील असुरक्षिततेची भावना दूर होण्यास मदत होते. यासोबतच आर्थिक भविष्यही सुरक्षित राहते.
आर्थिक प्रकरणात नॉमिनीद्वारे गुंतवणुकदार त्यांच्या संपत्तीचा उत्तराधिकारी घोषित करतो. गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर नॉमिनी संपत्तीवर दावा करू शकतो. कोणताही व्यक्ती त्याची मालकी हक्क असलेल्या स्थावर आणि जंगम मालमत्तेत नॉमिनीची नोंद करू शकतो. यात घर, शेती, बचत खातं, पीपीएफ, ईपीएफ, फिक्स डिपॉजिट आणि डिमॅट खात्यांचा समावेश आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे महागाईचा भडका; खाद्यतेलाच्या किंमतीत 20 ते 25 रुपयांची वाढ
रशिया-युक्रेन युद्धादरम्यान गुंतवणूकदारांना ‘फेडरल रिझर्व्ह’चा आधार; शेअर बाजार सावरला