विजबिलाचे पैसे आता कमी आकारले जाणार, ‘इतक्या’ रुपयांची बचत होणार, ऊर्जा मंत्रालयाकडून गुड न्यूज!

| Updated on: Jun 24, 2023 | 9:28 PM

ऊर्जा मंत्रालय सर्वसामान्य नागरिकांना लवकरच गिफ्ट देणार आहे. सर्वसामान्यांच्या विजबिलाच्या रकमेत घट व्हावी यासाठी ऊर्जा मंत्रालयाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. ऊर्जा मंत्रालयाची ही योजना यशस्वी झाली तर सर्वसामान्यांची दर महिन्याला विजबिलाचे 10 ते 20 टक्यांपर्यंतची बचत होणार आहे.

विजबिलाचे पैसे आता कमी आकारले जाणार, इतक्या रुपयांची बचत होणार, ऊर्जा मंत्रालयाकडून गुड न्यूज!
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : ऊन्हाळ्यात उकाड्यामुळे जीवाची अक्षरश: लाही लाही होते. अशा परिस्थितीत आपण घरातील पंखे, कुलर, एसी यांचा पुरेपूर वापर करतो. पण यामुळे लाईटबील देखील तितकंच येतं. कोरोना संकट काळात किती विजबील आलं होतं हे सगळ्यांनाच ठावूक आहे. अगदी अव्वाच्या सव्वा विजबील आले होते. पण नागरिकांनी नाईलजाने ती बिलं भरली होती. याशिवाय ऊन्हाळ्यात जास्त विजेचा वापर केल्याने विजेचं बिलही तितकंच येतं. पण आता ऊर्जा मंत्रालयाने यावर रामबाण उपाय शोधून काढला आहे. ऊर्जा मंत्रालयाच्या या उपायामुळे सर्वसामान्य नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे लाईटबील तब्बल 20 टक्क्यांनी कमी होणार आहे.

ऊर्जा मंत्रालयाने सर्वसामान्यांचा विजबिलाचा खर्च कमी व्हावा यासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ऊर्जा मंत्रालय लवकरच सौरऊर्जेचा वापर करुन सर्वसामान्य जनतेचा विजबीलाचा 20 टक्क्यांचा खर्च कमी करणार आहे. ऊर्जा मंत्रालय लवकरच नवीन वीज दर लागू करणार आहे, जे सर्वसामान्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

दिवसा आणि रात्री वेगवेगळे दर

विजेच्या नव्या दरानुसार, आपलं वीजेचं बिल हे दिवसा आणि रात्री वेगवेगळं असेल. याचा अर्थ दिवसा पुरवल्या जाणाऱ्या विजेला वेगळा दर असेल. तर रात्री पुरवल्या जाणाऱ्या विजेला वेगळा दर असेल. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने याबाबतची नुकतीच घोषणा केली आहे. दिवसा सौरऊर्जेमुळे वीजेच्या दरात 20 टक्क्यांनी कपात होणार आहे. त्यामुळे दिवसा पुरवल्या जाणाऱ्या सौरऊर्जेमुले विजेचं बिल 20 टक्क्यांनी कमी होणार आहे.

हे सुद्धा वाचा

नवे दर नेमके कधीपासून सुरु होणार?

मिळालेल्या माहितीनुसार, विजेचे नवे दर हे सुरुवातीला फक्त कंपन्या आणि कमर्शिय यूनिट (दुकानं) यांच्यासाठी लागू होतील. पण हळूहळू त्याचा विस्तार वाढवला जाईल. त्यानंतर पुढे फक्त कृषी विभाग वगळता सर्वच ठिकाणी हे दर वापरले जातील. पुढच्या वर्षी एप्रिलपर्यंत हे नवे दर लागू होण्याची शक्यता आहे. याबाबतच्या योजनेत 24 तासांपैकी 6 तास पीक अवर्स मानले जातील, जे सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत असतील.

टाईम ऑफ डे (टीओडी) च्या वीजदर प्रमाणालीनुसार, पीक हवर्स दरम्यान विजेचा दर हा सर्वसामान्य दरापेक्षा 10 ते 20 टक्क्यांनी कमी असेल. जेव्हा हे नवे दर लागू होतील तेव्हा ग्राहकांच्या विजबिलात 10 ते 20 टक्क्यांनी घट होईल, असा ऊर्जा मंत्रालयाचा दावा आहे. विशेष म्हणजे वीजेच्या बिलिंगसाठी स्मार्ट मीटरच्या आधारे रिडींग घेतले जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.