मुंबई : सध्या ऑफरचा जमाना आहे. अनेक कंपन्या आपली विक्री वाढावी किंवा ग्राहकांनी आकर्षिक व्हावं म्हणून काही ऑफर सुरू करत असतात. मात्र, तुमच्यापर्यंत येणारी प्रत्येक ऑफर खरीखुरीच असेल असं नाही. त्यामुळे अशा आकर्षक ऑफरची सत्यता तपासणं आवश्यक आहे. जर कोणतीही खातरजमा न करता या ऑफरच्या अटी मान्य केल्या तर तुमची मोठी फसवणूकही होऊ शकते. सध्या इंडियन ऑईल कंपनी ग्राहकांना सॅमसंग स्मार्टफोन देत असल्याची अशीच एक ऑफर सोशल मीडियावर फिरत आहे. याबाबत अनेक लोक उत्सुकही आहेत. या ऑफरची नेमकी सत्यता काय आहे याचीच ही तपासणी (Fact Check of viral message claim about Indian oil and Samsung smartphone offer).
संबंधित पोस्टमध्ये एका वेबसाईटच्या हवाल्यानं इंडियन ऑईलकडून सॅमसंग A52 स्मार्टफोन भेट म्हणून मिळत असल्याचं सांगितलं जात आहे. हे गिफ्ट मिळवण्यासाठी या ऑफरचा मेसेज 5 ग्रुप किंवा 20 मित्रांना शेअर करण्यास सांगितलं जातंय. यानंतर गिफ्ट मिळेल असं आश्वासन देण्यात येतंय. या मेसेजमध्ये एका वेबसाईटची लिंकही शेअर करण्यात आलीय.
सॅमसंग स्मार्टफोन गिफ्ट म्हणून देण्याचा दावा करणाऱ्या या पोस्टवर आता स्वतः इंडियन ऑईलनेच ट्विट करुन माहिती दिलीय. यात कंपनीने म्हटलं, “इंडियन ऑईलबाबत दावा करण्यात आलेली माहिती चुकीची आणि फसवी आहे. यावर कुणीही विश्वास ठेऊ नये. फसवणूक करणारे काही लोक किंवा संस्था फेक लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीस देण्याचा खोटा दावा करत आहेत. लोकांनी कोणत्याही ऑफरची खातरजमा इंडियन ऑईलच्या अधिकृत वेबसाईट किंवा ट्विटर हँडलवर तपासावी. इतर माहितीवर विश्वास ठेऊ नये.”
इंडियन ऑईलच्या नावाने देण्यात येणाऱ्या या ऑफरला अनेकजण बळी ठरत आहेत. त्यामुळे अशी आकर्षिक करुन घेणारी कोणतीही ऑफर आली तर कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी किंवा व्यक्तिगत माहिती इतरांना देण्याआधी त्याची खातरजमा करा. आमिषाला बळी पडू नका. अन्यथा तुमची फसवणूक होण्याचा धोका आहे. कोणत्याही माहितीची सत्यता तपासण्यासाठी ज्या कंपनी, संस्था अथवा मंत्रालयाबाबत दावा करण्यात आलाय त्यांच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन भेट द्या. तेथे ती माहिती किंवा ऑफर असेल तर विश्वास ठेवा अन्यथा त्यापासून दूर राहा.