नवी दिल्ली : भारतातील काही राज्यात मुसळधार पावसाने (Heavy Rain) थैमान घातलं आहे. तर काही ठिकाणी पावसाने डोळे वटारले आहेत. त्यामुळे खरीपाचं पिक (Kharif Crop) हातचं गेले आहे. जे पीक आहे, त्याचं उत्पादन (Production) कमी होणार आहे. त्याचा परिणाम किंमतीवर होणार आहे.
देशातील किरकोळ महागाई ऑगस्ट महिन्यात 7 टक्क्यांवर पोहचली आहे. अर्थव्यवस्था झपाट्याने विकसीत देशांच्या अर्थव्यवस्थांना मागे टाकत आहे. भारताची अर्थव्यवस्था 5 व्या स्थानी झेपावली आहे. तर महागाई तिच्या सर्वोच्च पातळीवर आहे.
मंदीचा परिणाम भारतीय बाजारपेठेवर अजूनही ठळकपणे दिसून आलेला नाही. सणासुदीच्या दिवसात महागाई पुन्हा भडकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे यंदा सणाच्या आनंदावर विरजण पडू शकते.
यंदा तांदळाचे उत्पादन घटणार आहे. थोडंथोडकं नव्हे तर तब्बल 60-70 लाख टन तांदळाचे उत्पादन घसरणार आहे. उत्पादनातील ही मोठी घसरण सर्वसामान्य माणसाला फटका देणारी ठरणार आहे.
नवीन धान आणि गव्हाचे पीक कमी येणार असल्याने किंमती भडकतील. ऐन सणासुदीत हा फटका सर्वसामान्यांना बसण्याची शक्यता आहे. सरकारने तांदळाच्या निर्यातीवर प्रतिबंध लावला आहे. त्याचा परिणाम दिसून येईल, तरी किंमती वाढण्याची भीती आहे.
गेल्या काही महिन्यांत सर्वच खाद्यान्न आणि रोजच्या वापरातील पदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत. किरकोळ महागाई दर पुन्हा चढा आहे.
तज्ज्ञांच्या मते, महागाई काही दिवस उच्चस्तरावरच राहिल. महागाईपासून जनतेची सूटका होणार नाही. त्यातच धानाचं उत्पादन घसरल्याने येत्या काही दिवसात चिंता वाढण्याची शक्यता आहे. महागाईचा पुन्हा भडका उडण्याची शक्यता आहे.
भारतात तांदळाचे उत्पादन वर्ष 2021-22 मध्ये 13.029 कोटी टन झाले होते. त्याअगोदर हा आकडा 12.437 कोटी टन होता. कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार, यंदा हे उत्पादन 60-70 लाख टनांनी घसरेल.
खरीपचं हातचा गेल्याने चिंता वाढली आहे. तांदळाच्या एकूण उत्पादनात खरीपाचा वाटा तब्बल 85 टक्के इतका आहे. यावरुन नुकसानीचा अंदाज बांधता येतो.