मुंबई: भारतीय गुंतवणूकदारांमध्ये बँकेतील मुदत ठेव योजनांचा (Fixed Deposit Scheme) पर्याय नेहमीच लोकप्रिय राहिला आहे. तुलनेत कमी जोखमीची आणि हमखास परतावा देणारी गुंतवणूक म्हणून फिक्स्ड डिपॉझिटकडे पाहिले जाते. त्यामुळे आजही गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असूनही सामान्य गुंतवणूकदार फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देतात.
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्ही अवघ्या सात दिवसांपासून ते दीर्घकालीन गुंतवणूक करु शकता. गेल्या काही काळात अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदावल्यामुळे बँकांनी मुदत ठेव योजनांवरील व्याजदर कमी केला आहे. त्यामुळे ग्राहक सातत्याने फिक्स्ड डिपॉझिटवर जास्त व्याज मिळवून देणाऱ्या योजनांच्या शोधात असतात.
यापूर्वी भारतीय स्टेट बँक (SBI), HDFC बँक आणि आयसीआयसीआय बँकेत मुदत ठेवीवर चांगले व्याज मिळत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांमध्ये या बँकांकडून मुदत ठेवीवरील व्याजदर घटवण्यात आले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांनी आपला मोर्चा स्मॉल फायनान्स बँकाकडे वळवला आहे. या बँकांकडून मुदत ठेवीसाठी 6.75 ते 7 टक्क्यांच्या घरात व्याज दिले जात आहे.
जन स्मॉल फायनान्स बँक सध्या एकमेव बँक आहे, जी सामान्य जनतेला 1 वर्षांच्या ठेवींवर 6.25 टक्क्यांपर्यंत व्याज दर देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर 6.75 टक्के आहे.
उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक नियमित ग्राहकांना 6.00 टक्के व्याज दर देणाऱ्या बँकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ती 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर 6.50 टक्क्यांपर्यंत परतावा देत आहे. ही व्याज दर रक्कम 1 वर्षापासून 2 वर्षांपर्यंतच्या FD योजनेसाठी आहे. म्हणजेच, सामान्य नागरिक 6 टक्के व्याज आणि ज्येष्ठ नागरिक 6.50 टक्क्यांपर्यंत कमावू शकतात.
खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांपैकी एक असलेली इंडसइंड बँक सध्या 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर सामान्य जनता आणि ज्येष्ठ नागरिकांना अनुक्रमे 6 टक्के आणि 6.50 टक्के व्याज देत आहे. एक वर्षाच्या मुदत ठेवीसाठी हे व्याजदर लागू आहेत. 1 वर्ष आणि 6 महिन्यांपेक्षा कमी FD वर समान व्याज दर दिला जात आहे.
RBL बँक ही खाजगी क्षेत्रातील बँक आहे जी FD घेणाऱ्यांसाठी आकर्षक ऑफर चालवत आहे. सामान्य लोकांना 3 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर 6.00 टक्के व्याज दर देणारी ही खाजगी क्षेत्रातील दुसरी बँक आहे. 12 महिने ते 24 महिन्यांच्या मुदत ठेवीसाठी 6 टक्के व्याजदर आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याज दर 6.50 टक्के आहे.
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवताना व्याजदर हाच एकमेव निकष ठेवू नका. जास्त व्याजाच्या हव्यासापोटी कोणतीही पतपेढी किंवा लहानसहान बँकेत पैसे गुंतवू नका. त्यासाठी चांगले रेटिंग असलेल्या पतपेढी आणि बँकांची निवड करा.
मुदत ठेव योजनांमध्ये पैसे किती कालावधीसाठी गुंतवायचे हे आपल्या गरजेनुसार आणि सोईनुसार ठरवा. तुमच्याकडे जास्त पैसे असतील आणि पुढील पाच-दहा वर्षे या पैशांची फारशी गरज लागणार नाही, असे वाटत असल्यास पैसे FD मध्ये गुंतवा. एक किंवा दोन वर्षांच्या तुलनेत दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास FD वर जास्त व्याज मिळते.
संंबंधित बातम्या:
आता गुगलही बँकांप्रमाणे फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु करणार; एका वर्षासाठी किती व्याज मिळणार?
Fixed Deposit मध्ये गुंतवणूक करायची? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवताना ‘या’ चार गोष्टी नक्की ध्यानात ठेवा