आपल्या देशात सरकारी संस्थेचे कोट्यवधी निवृत्तीधारक आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे महिने या निवृत्तीधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. मात्र निवृत्तीधारकांसाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने जीवन प्रमाण ही डिजीटल सेवा सुरु केली आहे. या उपक्रमामुळे आता निवृत्तीधारकांचा प्रश्न सुटलेला आहे. कारण या सेवेआधी निवृत्तीधारकांना व्यक्तीकरित्या बँकेत जाऊन जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागायचे. त्यामुळे वृद्ध निवृत्तीधारकांसाठी वेळ खाऊ आणि कष्टदायी प्रक्रिया असायची. मात्र आता सरकारने अशी काही व्यवस्था केली आहे की, निवृत्तीधारकांना घरबसल्या डिजीटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र बनवून सादर करता येईल. ते कसे करावे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
डिजिटल जीवन प्रमाणपत्र ही निवृत्तीधारकांसाठी बायोमेट्रिक-सक्षम डिजिटल सेवा आहे. जी केंद्र किंवा राज्य सरकार, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेचे निवृत्तीवेतनधारक ज्यांची पेन्शन वितरण एजन्सी डीएलसीसाठी सक्रिय आहे त्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.
सध्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) डिजिटल लाइफ सर्टिफिकेट देत आहे. त्यासाठी बँकेने भारत सरकारच्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर अर्थात एनआयसीशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्षात एनआयसीच्या अर्जावर DLC देण्यात येत आहे.
निवृत्तीधारकांनी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे. जर वृद्ध निवृत्तीधारकांना पोस्ट ऑफिसमध्ये जात येत नसेल, तर त्यांनी पोस्टमन किंवा ग्रामीण सेवा डाक सेवामार्फत घरपोच सेवेचा लाभ घेता येतो. यावेळी टपाल सेवकाला आपल्या पेन्शन खात्या संदर्भात मूलभूत माहिती द्या. यामुळे तुमचा डिजीटल जीवन प्रमाण तयार होण्यास मदत होईल.
जर तुम्हाला डिजीटल जीवन प्रमाण पत्र काढायचं असेल तर तुमच्याकडे बँक खात्याचा तपशील, मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक, पेन्शन पेमेंट घेतल्याची प्रत किंवा पेन्शन पेमेंट ऑर्डरची मूळ प्रत असणे आवश्यक आहे.
निवृत्तीधारकांना त्याचा आधार क्रमांक, नाव, मोबाइल क्रमांक आणि स्वयंघोषित पेन्शनशी संबंधित माहिती जसे की पीपीओ क्रमांक, पेन्शन खाते क्रमांक, बँक तपशील, पीएसए, पीडीए नाव इत्यादी संबंधित माहिती द्यावी लागणार आहे. निवृत्तीधारकाला त्यांचे बायोमेट्रिक्स, आयरिस किंवा फिंगरप्रिंट देखील द्यावे लागणार आहे. कारण सध्या आयपीपीबीच्या माध्यमातून केवळ फिंगरप्रिंटचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.
घरबसल्या लाइफ सर्टिफिकेट बनवण्यासाठी तुम्हाला फक्त ७० रुपये फी भरावी लागते. यात सर्व्हिस टॅक्सचाही समावेश आहे.
अनेकदा निवृत्तीधारकांना प्रश्न पडतो की, डीएलसी केल्यानंतर हे प्रमाणपत्र बँक/पोस्ट ऑफिस वगैरेमध्ये सादर करण्याची गरज आहे का? निवृत्तीधारकाला डीएलसी हे प्रमाणपत्र बँक / पोस्ट ऑफिस / पीडीए मध्ये सादर करण्याची आवश्यकता नाही. कारण तुम्ही केलेल्या डिजीटल प्रक्रियेमार्फत तुमची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे.