नवी दिल्ली: देशातील पेट्रोलियम कंपन्यांकडून सामान्य नागरिकांना पुन्हा एकदा दिलासा देण्यात आला आहे. रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर आहेत.
पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी सकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 103.97 रुपये आणि डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 आणि 94.14 रुपये प्रतिलीटर इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील.
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरात पुन्हा घसरण होताना दिसत आहे. इंधन तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमतीत शनिवारीही घसरण दिसून आली. कच्च्या तेलाचा वापर फक्त पेट्रोल आणि डिझेल बनवण्यासाठीच नाही तर इतर अनेक उत्पादनांसाठी केला जातो. त्यामुळे खनिज तेलाच्या किंमतीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचे दर कमी होत असूनही भारतात मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात विशेष कपात झालेली नाही.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करामध्ये कपात केल्यानंतर आता महाराष्ट्रातही इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात दोन रुपयांची कपात केली जाऊ शकते. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती कपात होणार, याचे चित्र स्पष्ट होईल. इंधन दरात कपात झाल्यास राज्यातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
यापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 5 रुपये आणि 10 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर अनेक राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी करत आपापल्या राज्यातील जनतेला आणखी स्वस्तात इंधन उपलब्ध करुन दिले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारही इंधन दरकपातीचा निर्णय कधी घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.
आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.
संबंधित बातम्या:
इलेक्ट्रिक वाहन मालकांचं टेन्शन कमी होणार, BPCL 7000 पेट्रोल पंपांवर चार्जिंग स्टेशन उभारणार
Petrol Diesel Price: आजपासून पंजाबमध्ये पेट्रोल 10 आणि डिझेल 5 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव