मुंबई: हिंदू संस्कृतीनुसार साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसऱ्याच्या सणापूर्वी सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांना चांगली संधी चालून आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावात लक्षणीय घसरण झाली आहे. शुक्रवारी बाजारपेठा उघडल्यानंतर ही मालिका सुरुच राहिली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव 0.05 टक्क्यांनी घसरला. तर चांदीच्या भावातही 0.19 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.
शुक्रवारी सकाळच्या सत्रात मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव प्रतितोळा 46,497 रुपये इतका आहे. तर एका किलो चांदीसाठी 59,504 रुपये मोजावे लागत आहेत.
गेल्यावर्षी सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्या स्तरापेक्षा सोने सध्या 9700 रुपयांनी स्वस्त झाले आहे. मात्र, आगामी काळात सोन्याचा भाव पुन्हा वाढेल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे.
सध्या सोने गेल्या काही महिन्यांतील जवळपास निचांकी पातळीवर आहे. सध्या पितृपक्ष सुरु असल्याने सोन्याची खरेदी आणखी खालावून किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. यानंतर दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ शकते. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या सध्याचा काळ हा सोने खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
आगामी काळात सोन्याचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होईल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एवढेच नव्हे तर आगामी पाच वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत.
याच काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.
संबंधित बातम्या:
Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका
आता ऑनलाईन सोने खरेदीचा ट्रेंड सुरू, ज्वेलर्स 100 रुपयांना विकतायत सोने, डिलिव्हरीसुद्धा घरपोच