मुंबई: गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी बाजारपेठेत सोन्याच्या दरात किंचित वाढ होताना दिसली. शुक्रवारी सोन्याचा प्रतितोळा दर 47070 रुपये इतका होता. शनिवारी हा दर अवघ्या 10 रुपयांनी वाढून 47080 रुपये इतका झाला.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा प्रतितोळा दर 47,451 रुपये इतका होता. तो आठवड्याच्या शेवटापर्यंत 46,793 रुपयांच्या पातळीवर आला होता. त्यामुळे आठवडाभरात सोनं 500 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
तर दुसरीकडे शनिवारी चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दरात 0.05 टक्क्यांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचा भाव 64,150 रुपये प्रतिकिलो या पातळीवर येऊन पोहोचला. आठवड्याच्या पहिल्या दिवशी एका किलो चांदीसाठी 65,261 रुपये मोजावे लागत होते.
दुप्पट होऊ शकतो सोन्याचा दर
पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किंमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. HDFC सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igno Fund) देण्यात आले आहेत.
याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची आता देशभरातील सराफा व्यापाऱ्यांकडून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे आता सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनम आणि मौल्यवान रत्नांची खरेदी रोख पैसे देऊन करायची असल्यास तुम्हाला आधारकार्ड आणि पॅनकार्ड दाखवणे बंधनकारक राहील. अन्यथा देशातील कोणत्याही ज्वेलर्समध्ये तुम्हाला सोने खरेदी करता येणार नाही.
तसेच पेढी आणि सोने व्यापाऱ्यांना 10 लाखापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारांचे तपशील ठेवणे बंधनकारक असेल. या नियमांचे उल्लंघन केल्यास तीन ते सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करु लागले आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत.
संबंधित बातम्या :
Gold Price: पाच वर्षात सोनं सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार, एक तोळा सोन्याचा दर 90 हजारांवर?
Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका