मुंबई: देशभरात सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंगचा नियम अनिवार्य झाला असला तरी त्याच्या अंमलबजावणीचे तीनतेरा वाजले आहेत. हॉलमार्किंगचा कारभार सरकारकडून मनमानी पद्धतीने हाकला जात असल्याप्रकरणी आता सराफा व्यापाऱ्यांना आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या सोमवारी देशभरातील सराफा व्यापाऱ्यांकडून याविरोधात लाक्षणिक आंदोलन करण्यात येईल. देशभरातील सराफा व्यापाऱ्यांच्या 350 संघटना या आंदोलनात सहभागी होतील.
16 जूनपासून देशभरात हॉलमार्किंगच्या नियमाची अंमलबजावणी झाली होती. त्यानुसार आता सोन्याची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक आहे. मात्र, या सगळ्याविषयी ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्येही पुरेशी स्पष्टता नसल्याचे वारंवार दिसून आले आहे.
Gold Hallmarking नव्या नियमांविषयी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या संकेतस्थळावर किंवा इंटरनेटवर सर्वाधिक विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमधून FAQ या बदलांची तितकीशी माहिती मिळत नाही, असे व्यापाऱ्यांनी यापूर्वीच सांगितले होते. मात्र, त्यानंतरही सरकारकडून याबाबत काही ठोस पावले उचलण्यात आली नव्हती. त्यामुळे अद्यापही हॉलमार्किंगच्या अंमलबजावणीविषयी संभ्रमाचे वातावरण आहे.
सध्याच्या HUID प्रणालीच्या माध्यमातून दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी 5 ते 10 दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हॉलमार्किंगमुळे सोन्यात कोणतीही भेसळ होणार नाही, असे सरकारला वाटते. मात्र, लहान व्यापाऱ्यांना सरकारने केवळ आपल्यावर नजर ठेवण्यासाठी हॉलमार्किंगचा नियम केल्याची भावना आहे. हॉलमार्किंगची प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ आहे. अशा पद्धतीने दागिने हॉलमार्क करवून घ्यायचे झाल्यास यंदा तयार झालेल्या दागिन्यांना हॉलमार्क करवून घेण्यासाठी तीन ते चार वर्ष लागतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
संबंधित बातम्या:
Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका
Gold: एक व्यक्ती किती सोने बाळगू शकते, काय आहे कायदा, जाणून घ्या सर्वकाही
सोन्याच्या भावात मोठी घसरण, भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती