मुंबई: कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्यातील गुंतवणुकीला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्यावर्षी सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात सोन्याच्या दरात बरीच घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, आगामी काळात सोन्याचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होईल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एवढेच नव्हे तर आगामी पाच वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत.
याच काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.
अमेरिकेच्या फेडरल बँकेच्या धोरणामुळे मध्यंतरी सोने स्वस्त झाले होते. मात्र, आगामी काळात सोन्याचा दर प्रचंड वाढेल. यापूर्वी क्वाड्रिगा इग्नियो फंडने 2016 मध्ये सोने सार्वकालिक उच्चांक गाठेल, असा अंदाज वर्तवला होता. क्वाड्रिगा इग्नियो फंड गेल्या 25 वर्षांपासून सोन्याशी संबंधित व्यवहार करत आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षांमध्ये भारतात सोने 90 हजारांवर पोहोचणार असेल तर खरेदीसाठी हीच योग्य वेळ आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव असून सोने 47 हजारांच्या खाली आले आहे. मात्र, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या उदयानंतर सोन्याचे भाव (Gold rates) पुन्हा वर जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे जाणकारांकडून सोन्याचा दर आणखी खाली आल्यास खरेदीचा सल्ला दिला जात आहे.
सध्या सोन्याचा दर हा दोन महिन्यांतील निच्चांकी पातळीवर आहे. मल्टी कमोडिटी एक्सेंजमध्ये सोन्याच्या किंमतीला 46500 रुपयांच्या पातळीवर भक्कम सपोर्ट आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा प्रतितोळा दर 46,615 इतका होता. त्यामुळे सोन्याचा दर सपोर्ट प्राईसच्या अत्यंत जवळ आहे. या पातळीपर्यं पोहोचल्यानंतर सोन्याच्या किंमती पुन्हा वरच्या दिशेने प्रवास सुरु करतील. अशातच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे अनिश्चिततेच्या वातावरणात आणखी भर पडली आहे. त्यामुळे येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याच्या किंमती 52 हजाराचा टप्पा गाठतील, असा जाणकारांचा अंदाज आहे.
संबंधित बातम्या:
Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका
Gold: एक व्यक्ती किती सोने बाळगू शकते, काय आहे कायदा, जाणून घ्या सर्वकाही
सोन्याच्या भावात मोठी घसरण, भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती