मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्याने गुरुवारी सोन्याचा भाव वधारताना दिसला. 45800 च्या स्तरापर्यंत घसरण झाल्यानंतर सोन्याच्या किंमतीने पुन्हा वरच्या दिशेने प्रवास सुरु केला होता. गुरुवारी सकाळी वायदे बाजारात सोन्याचा भाव वाढून 46394 च्या स्तरापर्यंत पोहोचला. तर डिसेंबर डिलिव्हरीच्या सोन्याची किंमत 20 रुपयांनी वधारून 46580 च्या पातळीवर पोहोचली. तर दुसरीकडे चांदीच्या दरात 156 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचा प्रतिकिलो भाव 62615 रुपये इतका झाला आहे.
यापूर्वी बुधवारी MCX वर ऑक्टोबर वायदा सोन्याचा भाव 0.15 टक्के किंवा 68 रुपयांच्या वाढीसह 46,030 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला होता. तत्पूर्वी मंगळवारी ल्ली सराफा बाजारात सोने 176 रुपयांनी कमी होऊन 45,110 रुपये प्रति दहा ग्रॅमवर स्थिरावले होते. सोमवारी बाजार बंद होताना सोन्याचा भाव प्रतितोळा 45,286 रुपये इतका होता.
सॉवरेन गोल्ड बाँड योजना 2021-22 मालिका 5-9 ऑगस्ट ते 13 ऑगस्टदरम्यान उघडण्यात आली. सेटलमेंटची तारीख 17 ऑगस्ट 2021 आहे. अर्ज कालावधीत बॉण्डची इश्यू किंमत 4,790 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली. गोल्ड बॉण्डची किंमत बाजारातील सोन्याच्या स्पॉट प्राईसशी जोडलेली असते. यामध्ये गुंतवणुकीवरील व्याजाच्या स्वरूपात अतिरिक्त परतावा उपलब्ध आहे. देशातील नागरिक हिंदू अविभक्त कुटुंब ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था यामध्ये गुंतवणूक करू शकतात. सॉवरेन गोल्ड बाँड योजना अशा गुंतवणूकदारांसाठी चांगली आहे, ज्यांना भौतिक सोन्यामध्ये गुंतवणूक करायची नाही.
कोरोना संकटामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सोन्यातील गुंतवणुकीला पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे. गेल्यावर्षी सोन्याच्या किंमतीने 56200 रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात सोन्याच्या दरात बरीच घसरण पाहायला मिळाली होती. मात्र, आगामी काळात सोन्याचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होईल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एवढेच नव्हे तर आगामी पाच वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या:
Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका
Gold: एक व्यक्ती किती सोने बाळगू शकते, काय आहे कायदा, जाणून घ्या सर्वकाही
सोन्याच्या भावात मोठी घसरण, भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती