मुंबई : सरकारी ई-मार्केटप्लस जेईएमने (Government e-Marketplace portal- GeM) ग्राहकांना इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपेक्षा स्वस्त आणि टिकाऊ वस्तू उपलब्ध करुन दिल्याचे समोर आले आहे. विविध वस्तूंच्या किंमतीची तुलना अॅमेझॉन, फ्लिपकार्ट (Amazon, Flipkart) सारख्या लोकप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या किंमतींशी करण्यात आली. त्यावेळी जीईएमच्या किंमती अॅमेझॉनसह फ्लिपकार्टपेक्षा 9.5% कमी असल्याचे आर्थिक सर्वेक्षण (economic survey) 2021-22 मधील विश्लेषणात सोमवारी दिसून आले. इतर दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपेक्षा नमुना पद्धतीने घेण्यात आलेल्या 22 पैकी 10 वस्तूंच्या किंमती जीईएम पोर्टलवर स्वस्त असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. जीईएमला अधिकाधिक लोकाभिमूख केल्यास या दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला तगडा प्रतिस्पर्धी तयार होऊ शकतो. त्यादृष्टीने केंद्र सरकार पाऊले टाकणार असून जीईएमच्या किंमती कमी असल्याने ग्राहक आपोआप या प्लॅटफॉर्मकडे वळतील अशी आशा आहे. विशेष म्हणजे या प्लॅटफॉर्मवर किंमती कमी असल्या तरी वस्तूंच्या दर्जात कुठेही तडजोड करण्यात आलेली नाही.
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट ही सध्या सर्वाधिक लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहेत. या दोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मपेक्षा नमुना पद्धतीने घेण्यात आलेल्या 22 पैकी 10 वस्तूंच्या किंमती जीईएम पोर्टलवर स्वस्त असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. उदाहरणार्थ, पार्कर जॉटर स्टँडर्ड बॉल पेनची ऑफर किंमत जीईएमवर 200 रुपये होती, तर इतर पोर्टलवर 207 रुपये होती. त्याचप्रमाणे मिल्टन 1500 मिली थर्मासची किंमत जीईएमवर 1,101 रुपये आहे, तर इतर प्लॅटफॉर्मवर 1,499 रुपये होती. या विश्लेषणातील इतर काही उत्पादनांमध्ये गोदरेज इंटरियो एलिट मिड बॅक चेअर, बजाज पल्सर 220 एफ, गोदरेज इंटरियो स्टील अल्मिराह 2400 मिमी आणि सॅमसंग बेसिक टेलिव्हिजन टीव्ही 43 इंच एलईडी बॅकलिट एलसीडी यासारख्या वस्तूंचा समावेश होता. सर्वेक्षणात या सर्व वस्तू स्वस्त असल्याचे समोर आले आहे.
‘या ई-मार्केटप्लेसच्या वापरामुळे वस्तुंच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे. सरासरी बाजारभावापेक्षा या ई-कॉमर्स पोर्टलवरील वस्तुंच्या किंमती 15 ते 20 टक्के तर काही ठिकाणी 56 टक्क्यांपर्यंत वस्तुंच्या किंमती कमी झाल्याचे सर्वेक्षणातून दिसून आले. जागतिक बँकेने(World Bank) केलेल्या जीईएमच्या किंमतींचा पडताळा घेतला असता आर्थिक सर्वेक्षणाशी तो सुसंगत असल्याचे दिसून आले. फेब्रुवारी 2019 ते जानेवारी 2020 दरम्यानच्या कालावधीसाठी सरासरी किंमतीवर जीईएम या ई-कॉमर्स पोर्टलवर ग्राहकांची सरासरी 9.75 टक्के बचत झाली. या पोर्टलवर पहिल्या पाच श्रेणीतील वस्तुंच्या किंमतीवर 23.5% ते 60.5% पर्यंत बचतीचे उद्दिष्टय साध्य झाले.
सरकारने 2016 मध्ये दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या खरेदीसाठी जीईएम या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची स्थापना केली. खरेदीसाठी ही एक सोपी, पारदर्शक आणि पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया आहे. जनरल फायनान्शियल रूल्स (financial Rules) 2017 नुसार सर्व मंत्रालये आणि विभागांना जीईएमकडून उपलब्ध वस्तू आणि सेवा खरेदी करणे बंधनकारक असल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या :
‘या’ कंपनीचा सॅलरी पॉलिसीसंदर्भात मोठा निर्णय, आता कर्मचाऱ्यांना मिळणार दर आठवड्याला पगार
भारतात ई-कॉमर्स मार्केटमध्ये खूप वेगाने वाढ, 2030 पर्यंत बाजार 40 अब्ज डॉलरचा होणार