नवी दिल्ली: अलीकडच्या काळात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी गुगल पे हे मोबाईल अॅप सर्रासपणे वापरले जाते. मात्र, गुगल पे ग्राहकांच्या आधार आणि बँकिंग तपशीलांचा गैरवापर करत असल्याची याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ‘गुगल पे’कडून ग्राहकांचा डेटा अनधिकृरित्या साठवला जातो. गुगल पे एक खासगी कंपनी असल्यामुळे त्यांना अशाप्रकारे ग्राहकांची गोपनीय माहिती साठवण्याचा आणि वापरण्याचा अधिकार नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंग यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी झाली. याचिका दाखल करणारे अर्थतज्ज्ञ अभिजित मिश्रा यांची बाजू ऐकल्यानंतर खंडपीठाने रिझर्व्ह बँक आणि युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाला (UIDAI) यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत.
गुगल पे अॅपचा वापर करण्यासाठीच्या अटी-शर्तींमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की, कंपनी युजर्सच्या पेमेंट तपशीलांचा डेटा साठवेल. यामध्ये आधार आणि बँक अकाऊंटच्या माहितीचाही समावेश असेल. कोणत्याही खासगी कंपनीला अशाप्रकारे ग्राहकांची माहिती साठवता येत नाही. त्यामुळे गुगल पे नियमांचे उल्लंघन करत असल्याचे याचिकाकर्ते अभिजित मिश्रा यांचे म्हणणे आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याचिकेवर नोटीस बजावताना गुगल इंडिया डिजिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. अर्थतज्ज्ञ अभिजित मिश्रा यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
बँका आणि बिगरबँकिंग वित्तीय संस्थांप्रमाणे आता गुगलनेही मुदत ठेव योजना (Fixed Deposite Scheme) सुरु केली आहे. केवळ भारतातील ग्राहकांसाठी गुगलने ही योजना सुरु केली आहे. त्यानुसार ग्राहक Google Pay च्या माध्यमातून FD खरेदी करु शकतील. सेतू या फिनटेक कंपनीच्या साहाय्याने गुगलने ही योजना सुरु केली आहे.
या कंपनीच्या एपीआयच्या माध्यमातून गुगल ग्राहकांना मुदत ठेवीची सेवा देईल. मात्र, गुगल स्वत: ही स्कीम विकणार नाही. तर अन्य बँकांच्या एफडी ‘गुगल पे’च्या माध्यमातून थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देईल. यामध्ये सुरुवातीला इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँकेची मुदत ठेव योजना ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.
संबंधित बातम्या:
आता ‘गुगल पे’ वापरुन खरेदी करा सोनं, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
परवानगीशिवाय ‘गुगल पे’ भारतात कसं चालतंय? हायकोर्टाचा सवाल
आता गुगलही बँकांप्रमाणे फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु करणार; एका वर्षासाठी किती व्याज मिळणार?