तालिबान्यांमुळे भारतीयांच्या आयुष्यात पडणार ‘मिठाचा खडा’; तुमच्या रोजच्या जेवणातील ‘ही’ गोष्ट महागणार

| Updated on: Aug 21, 2021 | 8:17 AM

Hing | रोजच्या आहारात वापरले जाणारे हिंग देखील अफगाणिस्तानमधून आयात केले जात होते. मात्र, आता व्यापार ठप्प झाल्याने हिंगाचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये बाजारपेठेत हिंगाचे भाव वाढण्याची शक्यता आहे

तालिबान्यांमुळे भारतीयांच्या आयुष्यात पडणार मिठाचा खडा; तुमच्या रोजच्या जेवणातील ही गोष्ट महागणार
हिंग
Follow us on

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अफगाणिस्तानातील घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारातील समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. तालिबानने अफगाणिस्तानातील प्रमुख शहरांवर ताबा मिळवल्याने येथील व्यापार पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील मालाची आयात आणि निर्यात थांबली आहे. परिणामी अफगाणिस्तानमधून निर्यात होणाऱ्या वस्तुंचा बाजारपेठेत तुटवडा जाणवत आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.

रोजच्या आहारात वापरले जाणारे हिंग देखील अफगाणिस्तानमधून आयात केले जात होते. मात्र, आता व्यापार ठप्प झाल्याने हिंगाचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये बाजारपेठेत हिंगाचे भाव वाढण्याची शक्यता आहे. भारतात हिंग तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल अफगाणिस्तान, उझबेकिस्तान आणि कझाकिस्तानमधून आयात केला जातो. अफगाणिस्तानमध्ये हिंगाची सर्वाधिक शेती केली जाते. हा माल भारतात आणून त्यापासून हिंग तयार होते.

कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानमधून भारतात येणाऱ्या कच्च्या मालावर 27 टक्के आयातशुल्क आकारले जाते. तर अफगाणिस्तानमधून येणाऱ्या मालावर आयात शुल्क लागत नव्हते. मात्र, आता अफगाणिस्तानमधील व्यापार ठप्प झाल्याने हिंगाचे भाव वाढायला सुरुवात झाली आहे. स्थानिक बाजारपेठांमध्ये महिनाभरापूर्वी हिंग प्रतिकिलो 9000 रुपये या दराने विकले जात होते. मात्र, आता हा दर 12000 रुपयांवर पोहोचला आहे.

हिंग कसे तयार होते?

हिंग हे वनस्पतीपासून तयार होते. अफगाणिस्तानात हिंगाची शेती केली जाते. हिंगाची रोपे भारतामध्ये आणून त्यांची पावडर तयार केली जाते. खाण्यात वापरले जाणारे हिंग हे रोपाच्या मुळापासून तयार केले जाते. संपूर्ण जगात हिंगाच्या एकूण 130 प्रजाती आहेत. बीजरोपण झाल्यानंतर चार ते पाच वर्षांत हिंगाचे रोप पूर्णपणे वाढते. एका रोपापासून साधारण अर्धा किलो हिंग मिळते. भारतात हिंगाची शेती फार दुर्मिळ आहे. हिमाचलमधील डोंगराळ भागात ही शेती केली जाते.

अफगाणिस्तानातील संघर्षाचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फटका

अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी वर्चस्व मिळवल्यानंतर त्याचा थेट परिणाम सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा तालुक्यातील केळी निर्यातीवर झाला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारताकडून अफगाणिस्तानात मोठ्या प्रमाणात केळी निर्यात केली जाते. मात्र या केळी निर्यातीचे करार रद्द केले आहेत. याचा आर्थिक फटक केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भारतातून अफगाणिस्तानात दर वर्षी किमान 30 टक्के केळी निर्यात होते.‌ दरम्यान अफगाणिस्तानात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे केळीची निर्यात थांबली आहे. वेळीच सुधारणा न झाली नाही तर, त्याचा आणखी फटका केळी निर्यातदार शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तान हा इराण नंतरचा भारतातून केळी आयात करणारा सर्वात मोठा देश आहे. माळशिरस तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी केळीचे उत्पादन केलंय. मात्र सध्या हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.

हे ही वाचा :

मुंबईत बदामाचे दर 680 वरुन थेट 1050 रुपये किलोवर, काजू-पिस्ताही महागला, कारण काय?

अफगाणिस्तानात तालिबान्यांचं ‘राज’, पण या तालिबानचा जन्म कसा झाला? पाकिस्तानने कसं पोसलं?, वाचा सविस्तर…

3 लाख अफगाण सैन्य असतानाही, 60 हजार तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा कसा मिळवला? वाचा काय आहेत मुख्य कारणं