नवी दिल्ली: हिट अँड रन अपघातांमध्ये मृत पावणाऱ्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या मदतीत वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने या नुकसानभरपाईची रक्कम 25 हजारावरुन 2 लाख रुपये इतकी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाने यासंदर्भातील प्रस्ताव मांडला असून त्याला लवकरच मंजुरी मिळू शकते.
त्यानुसार रस्ते अपघातामध्ये गंभीररित्या जखमी होणाऱ्या व्यक्तीला 50 हजाराची नुकसानभरपाई दिली जाईल. 2019 च्या आकडेवारीनुसार भारतात एकूण 4,49,002 रस्ते अपघात झाले. यामध्ये 1,51,113 लोकांचा मृत्यू झाला.
त्यामुळे केंद्र सरकार या मुद्द्याकडे गंभीरतेने बघत आहे. हिट अँड रन प्रकरणात पीडितांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईच्या निकषांमध्ये बदल झाला पाहिजे. गंभीर दुखापतीसाठी 12500 ते 50 हजार, तर मृत्यूसाठी 25 हजारऐवजी 2 लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, असे केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाने आपल्या प्रस्तावात म्हटले आहे.
केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाच्या प्रस्तावानुसार, हिट अँड रन प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यासाठी अपघाताची विस्तृत चौकशी, अहवाल आणि शोधप्रक्रिया टाईमबाऊंड पद्धतीने पूर्ण झाली पाहिजे. तसेच केंद्र सरकार एक मोटर व्हेईकल एक्सिडंट फंड तयार करेल. यामधून मृतांना आणि जखमींना नुकसानभरपाई दिली जाईल.
केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्रालयाच्या माहितीनुसार, 2019 या वर्षात हिट अँड रन केसमध्ये एकूण 536 जणांचा मृत्यू झाला. तर 1665 जण जखमी झाले.
संबंधित बातम्या:
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ वाहनांसाठी रजिस्ट्रेशन आणि RC शुल्क माफ
सर्व्हिसिंगसाठी नवीन कार नेताना या खास गोष्टी लक्षात ठेवा; अन्यथा महागात पडेल
पार्क केलेल्या गाडीवर एखादे झाड पडल्यास विमा मिळणार का? नियम काय सांगतो