नवी दिल्ली : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या शासकीय काम किंवा तुमच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक गोष्टीत अनेक बदल होतात. कारण सरकार यासंदर्भातील नियमात बदल करते. आता मार्च महिना संपायला अजून पंधरा दिवस बाकी आहेत. अशा स्थितीत अनेक महत्त्वाची कामे आहेत जी तुम्ही ३१ मार्चपूर्वी पूर्ण केली पाहिजेत. 1 एप्रिल 2023 पासून अनेक मोठे बदल होणार आहेत (Rules Changes From April 1, 2023) मार्चमध्ये महत्त्वाची कामे पूर्ण न केल्यास अडचणींना सामोरे जावे लागू शकते. १ एप्रिलपासून होणार्या या बदलांबद्दल तुम्हाला आधीच माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही हे कामे केल्यास यानंतर तुम्हाला या बदलांची काळजी करण्याची गरज नाही.
पॅन अन् आधार
आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करणे केंद्र सरकारने अनिवार्य केले आहे. हे दोन्ही कार्ड जोडण्यासाठी नागरिकांना अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मार्च 2023 पर्यंत ही शेवटची मुदत आहे. आधी मोफत असणाऱ्या या प्रक्रियेसाठी आता शुल्क लागत आहे. यापू्र्वी तुम्ही आधारला (Aadhar card) पॅन कार्ड (Pan Card) लिंक केले नसेल तर 31 मार्च ही अंतिम तारीख आहे. त्यानंतर आधारशी लिंक न करण्यात आलेले पॅनकार्ड आपोआप रद्द होतील. त्यामुळे अद्यापही आधारशी पॅन जोडले नसेल तर लगेचच करा.
सोने खरेदीसाठी नवा नियम
आपण जर सोने खरेदी किंवा विक्री करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. केंद्र सरकारने सोने आणि सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदी आणि विक्रीचे नियम बदलले आहेत.31 मार्च 2023 नंतर नवीन हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या अन्य वस्तूंना विकता नाही. नव्या नियमानूसार एक एप्रिलपासून केवळ सहा डिजिटवाले हॉलमार्कच मान्य असणार आहे. सहा आकडी हॉलमार्क शिवाय सोने आणि सोन्याच्या दागिन्यांची खरेदी विक्री करणे शक्य होणार नाही.
हा महत्वाचा बदल
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी अर्थात पीएफआरडीए नॅशनल पेन्शन सिस्टिमशी संबंधित एक नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. हा नियम पैसे काढण्याशी संबंधित आहे. पैसे काढताना सदस्यांना काही कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असेल. ही कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय NPS मधून पैसे काढू शकणार नाहीत. तुम्हाला आता केवायसी डॉक्युमेंट्स देणे बंधनकारक असणार आहे. कागदपत्रांमध्ये काही चूक झाल्यास तुमचे पैसे थांबवण्यात येतील.