नवी दिल्ली– सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय म्हणून पोस्ट ऑफिस योजनांना सर्वसामान्यांची नेहमीच पसंती असते. पोस्ट ऑफिस मार्फत व्यक्तिगत गुंतवणुकीचे विविध योजना उपलब्ध आहेत. बालक ते ज्येष्ठ नागरिक असे विविध वयोगटातील नागरिक गुंतवणुकीचे पर्याय अजमावू शकतात. विविध श्रेणीतील नऊ गुंतवणूक योजना (Investment scheme) सध्या गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहेत. तुम्हाला पोस्टाच्या योजनांसाठी खाते उघडावे लागेल. पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज दाखल करुन किंवा डिजिटल स्वरुपातही खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकच्या (IPBB) अॅपचा वापर यासाठी करू शकतात. IPBB द्वारे पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट, सुकन्या समृद्धी योजना आणि पीपीएफ खात्यात डिजिटल पेमेंट करण्याची सुविधा आहे.
सर्वप्रथम अकाउंट उघडा
पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये डिजिटल पेमेंट करण्यासाठी खातेधारकांना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक सेव्हिंग अकाउंट (IPPB-SA) उघडावे लागेल. त्यानंतर पोस्टाच्या विविध योजनांमध्ये डिजिटल पेमेंट करण्यासाठी खातेधारक सक्षम असतील. IPBB द्वारे ग्राहकांना डिजिटल सेव्हिंग्स अकाउंट उपलब्ध होते. ज्याद्वारे घरबसल्या सुविधा प्राप्त करू शकतात. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती अकाउंट उघडू शकते आणि अकाउंट सुरू ठेवण्यासाठी 12 महिन्यांच्या आत KYC (केवायसी) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तुम्ही या अकाउंटमध्ये अधिकतम 2 लाखांपर्यंत रक्कम जमा करू शकतात. डिजिटल सेव्हिंग्स अकाउंटला नियमित सेव्हिंग्स अकाउंटमध्ये कन्व्हर्ट केले जाऊ शकते. अकाउंटवर वार्षिक 2.50 टक्के दराने व्याज दिले जाते.
घरबसल्या पैसे कसे जमा करावे?
IPPB अकाउंट उघडल्यानंतर तुम्ही घरबसल्या पोस्ट ऑफिसच्या पीपीएफ, सुकन्या समृद्धी आणि रिकरिंग डिपॉझिट अकाउंट वर पैसे जमा करू शकतात.
– तुम्हाला सर्वप्रथम आयपीपीबी मोबाईल बँकिंग अॅप उघडावे लागेल आणि तुमच्या 4 अंकी एम-पिन मार्फत लॉग-इन करावे लागेल.
– तुमच्या समोरील स्क्रीनवर ‘DOP Services’ (डीओपी सर्व्हिसेस) पर्याय दिसून येईल. त्यानंतर तुम्ही पैसे जमा करू इच्छित असलेल्या योजनेवर क्लिक करा.
– रिकरिंग डिपॉझिट अकाउंट नंबर, सुकन्या समृद्धी अकाउंट नंबर किंवा पीपीएफ नंबर किंवा डीओपी कस्टमर ID एन्टर करा.
– रक्कम एन्टर करा आणि ‘देय करा’ वर क्लिक करा.
– तुमच्या देय रकमेची स्क्रीनवर पडताळणी करा आणि ‘कन्फर्म करा’ बटनावर क्लिक करा.
– तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर प्राप्त OTP एन्टर करा आणि ‘सबमिट करा’ बटनावर क्लिक करा.
– तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पेमेंट यशस्वी झाल्याचा मेसेज प्राप्त होईल.