Credit Card : आजकाल अनेकांजवळ क्रेडिट कार्ड असते. क्रेडिट कार्डचा वापर ही वाढला आहे. क्रेडीट कार्डवर आता मोठे व्यवहारही केले जात आहे. क्रेडिट कार्डच्या वापरावर काही रिवॉर्ड पॉइंट देखील मिळतात. त्यानंतर मग त्याच्यावर कॅशबॅक मिळवता येतात. शॉपिंग करण्यासाठी अनेक जण क्रेडिट कार्ड वापरतात. क्रेडिट कार्डची संपूर्ण मर्यादा संपेपर्यंत वापरतात. पण क्रेडिट कार्डची मर्यादा कितीही असतील तरी त्याचा वापर किती असला पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांंगणार आहे.
क्रेडिट कार्ड हे एक प्रकारचे कर्जच असते. ज्यावर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतात, खर्च करता आणि नंतर परतफेड करतात. तुमच्या क्रेडिट स्कोअरनुसार बँक त्याची मर्यादा ठरवते. पण जर तुम्ही मर्यादा संपेपर्यंत क्रेडिट कार्डचा वापर करत असाल तर ते चुकीचे आहे. कारण बँका तुम्हाला धोकादायक ग्राहक समजतात.
तुम्ही पूर्ण मर्यादा वापरत असाल तर तुम्ही कर्जावर अवलंबून असल्याचे बँकेला वाटते. दर महिन्याला जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर अशा परिस्थितीत बँक तुमची क्रेडिट मर्यादा वाढवू शकते. पण याचा तुमच्या CIBIL स्कोअरवर विपरित परिणाम होतो.
तुम्हाला जर तुमचा सीबील स्कोर चांगला ठेवायचा असेल तर तुम्ही क्रेडिट युटिलायझेशन रेशो म्हणजेच CUR 30 ते 40 टक्के ठेवले पाहिजे. जर ते 50 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर ते नकारात्मक मानले जाते. यामुळे तुम्हाला भविष्यात कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात किंवा अधिक व्याजावर कर्ज घ्यावे लागू शकते. कारण कर्ज घेताना क्रेडिट युटिलायझेशन रेशो देखील पाहिले जाते.
क्रेडिट कार्डची एकूण देय रक्कम एकूण कार्ड मर्यादेने विभाजित करा.त्यानंतर 100 ने गुणाकार करा. या सूत्राद्वारे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डच्या क्रेडिट युटिलायझेशन रेशोची गणना करू शकता.