नवी दिल्ली: नोकरदार व्यक्तींच्या पगारातील ठराविक रक्कम दर महिन्याला भविष्य निर्वाह निधीत (PF) जमा होत असते. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या उतारवयासाठीची पुंजी मानली जाते. कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर त्याला पीएफ खात्यामधील रक्कम काढता येते. सध्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर EPFO नोकरदारांना अडचणीच्या काळात वापरण्यासाठी पीएफची काही रक्कम आगाऊ काढण्याची सुविधा देऊ केली आहे.
नोकरी सोडल्यानंतर संबंधित अटींची पूर्तता करून तुम्ही पीएफ खात्यामधील रक्कम काढू शकता. त्यासाठी तुम्हाला फॉर्म 19/10सी भरावा लागतो. नोकरी सोडल्यानंतर किंवा निवृत्त झाल्यानंतर दोन महिन्यांनी तुम्ही हा फॉर्म भरू शकता.
* सर्वप्रथम www.epfindia.gov.in या संकेतस्थळावर जावे.
* संकेतस्थळावर गेल्यानंतर क्लेम (फॉर्म -31,19,10 सी आणि 10 डी) भरावा.
* याठिकाणी आपल्या बँक खात्याचे शेवटचे चार अंक टाकून व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी.
* प्रोसिड फॉर ऑनलाईन क्लेम या पर्यायवर क्लिक करावे. त्यानंतर तुमच्यासमोर एक ड्रॉपडाऊन मेन्यू येईल. त्यामध्ये Advacne (Form 31) हा पर्याय निवडावा.
* Form 31 भरताना तुम्हाला पैसे काढण्याचे कारण नमूद करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला किती रक्कम हवी आहे, तेदेखील नमूद करावे. तसेच आपल्या बँकेच्या चेकची स्कॅन कॉपी आणि पत्ता फॉर्ममध्ये नमूद करावा.
* यानंतर तुम्हाला मोबाईलवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी टाकल्यानंतर तुमचा क्लेम फाईल होईल.
तुमचे भविष्य निर्वाह निधी खात्याचा (PF Account) UAN नंबर आणि बँक खाते लिंक केलेले आहे की नाही, हे तपासावे. नंबर आणि बँक खाते लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळवण्यात अडचणी येतील. याशिवाय, EPFO च्या रेकॉर्डसमध्ये बँकेचा योग्य IFSC Code नमूद केलेला असावा.
अनेकदा पीएफ खातेधारकाने केवायसीची पूर्तता केलेली नसते. त्यामुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. याशिवाय, तुमचा केवायसी तपशील योग्य असणे गरजेचे आहे. तुम्ही EPFO च्या संकेतस्थळावर जाऊन या गोष्टी योग्य आहेत किंवा नाही, हे तपासू शकता.
EPFO ने UAN नंबर आधार कार्डाशी लिंक करणे सक्तीचे केले आहे. तसे न केल्यास तुम्हाला पीएफ खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. यासाठीची सगळी नियमावली EPFOकडून जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही फॉर्म भरताना चुकीचा बँक अकाऊंट नंबर टाकला असेल तर पैसे काढताना मोठी अडचण होऊ शकते. त्यामुळे फॉर्म काळजीपूर्वक भरा. अन्यथा तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो.
संबंधित बातम्या:
घाईघाईत PF चे पैसे काढताय, मग ‘या’ पाच चुका टाळा, अन्यथा….