नवी दिल्ली : अनेकदा करदाते इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरुन विसरुन पण जातात. पण इतका निष्काळजीपणा योग्य नसतो. अनेकांना रिटर्न भरल्यानंतर पण नोटीस (Notice) येते. करदात्यांना अनेक प्रकारच्या नोटीस येतात. कर आणि कमाई यात तफावत दिसल्यास नोटीस येते. रिटर्नमध्ये जर तुम्ही वाजवीपेक्षा अधिक परताव्याचे दावे कराल तर तुम्हाला हमखास नोटीस येईल. तुम्हाला माहिती आहे का किती प्रकारच्या नोटीस असतात आणि त्या का पाठविण्यात येतात? आयकर खात्याची (Income Tax Department) नोटीस आली तर घाबरण्याची गरज नाही. या नोटीसला योग्य उत्तर दिल्यास तुमच्यावरील संकट टळू शकते.
किती प्रकारच्या नोटीस?
आयकर नोटीस अनेक प्रकारच्या असतात. नोटीस कोणाला पाठविण्यात आली. यावर ते निर्भर असते. व्यक्तीपासून कंपनीपर्यंत आयकर खाते नोटीस पाठवते. जवळपास 15 ते 20 प्रकारच्या नोटीस असतात. त्यातील काही नोटीसचे प्रकार आपण जाणून घेऊयात..
कलम 142
जर एखाद्या व्यक्तीने प्राप्तिकर रिटर्न भरला नाही तर प्राप्तिकर अधिकारी कलम 142 अंतर्गत नोटीस पाठवू शकतो आणि रिटर्न भरण्यास सांगू शकतो. छोट्या छोट्या गोष्टींची माहिती मागविण्यासाठी पण या कलमातंर्गत नोटीस पाठविण्यात येऊ शकते.
कलम 143(2)
ही स्क्रूटनीची नोटीस असते. याचा अर्थ आयकर विभाग तुमच्याकडून अधिक खोल माहिती मिळवू इच्छिते. यामध्ये बुक ऑफ अकाऊंट्स, बँक स्टेटमेंट यासारखी माहिती मागविण्यात येते. त्याआधारे मूल्यांकन करण्यात येते. रिटर्न भरल्यानंतर पण नोटीस येऊ शकते. जास्त करुन स्क्रूटनीचीच नोटीस येते.
कलम 144
याला बेस्ट जजमेंट असेसमेंट (Best Judgement Assessment) असे म्हणतात. आयटीआर फाईल नाही केले तर 142 वा143 (2) कलमातंर्गत नोटीस देण्यात येते. त्याला उत्तर दिले नाही तर आयकर अधिकारी कलम -144 अंतर्गत नोटीस पाठवतो. यामध्ये अधिकारी उत्पन्न, कमाईच्या आधारे करदात्याला कर, व्याज आणि दंड आकारण्यात येतो.
या अंतर्गत पण नोटीस
कलम 147/148/149, कलम 143(1), रिटर्न भरताना त्यात चूक असल्यास कलम 139 (9), चौकशी आणि जप्तीसाठी कलम 153(A), कर, व्याज आणि दंड वसुलीसाठी कलम 156, उत्पन्न लपविण्याची शंका असल्यास कलम 131 (A) अतंर्गत नोटीस देण्यात येते.
नोटीसला घाबरण्याचे काय कारण
तज्ज्ञांच्या मते, छोट्या चुका असतील तर प्राप्तिकर खात्याच्या नोटीसला घाबरण्याची गरज नाही. अनेक नोटीस केवळ स्पष्टीकरणाच्या असतात. तुम्ही विहित पद्धतीने योग्य उत्तर दिल्यास, ते मान्य पण होते. पण तुम्ही संपत्ती, उत्पन्न यांची लपवाछपवी केल्यास मात्र त्यातंर्गत येणारी नोटीस तुमच्यासाठी संकट घेऊन येणारी असते. कलम 148 वा 144 अंतर्गत नोटीस आली तरी चिंतेची बाब ठरते.
नोटीस आल्यावर काय कराल
आयकर खात्याकडून आलेल्या नोटीसला उत्तर देणे क्रमप्राप्त आहे. उत्तर दिले तर अडचणी कमी होतात. संपून जातात. ज्या कलमातंर्गत नोटीस दिली आहे, ते समजून तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली नोटीसचं उत्तर देणे फायद्याचे ठरते. अनेक करदात्यांचे इनकम टॅक्सच्या पोर्टलवर मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी रजिस्टर नसतो. त्यामुळे त्यांना नोटीस मिळत नाही. तेव्हा अगोदर मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी रजिस्टर करुन घ्या.