नवी दिल्ली: आयकर भरण्यासाठी लाँच करण्यात आलेल्या नव्या पोर्टलवरील तांत्रिक बिघाड लवकरच दूर होण्याचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भातील संकेत दिले. Income Tax पोर्टल वापरताना करदात्यांना अडचणी येत आहेत. मात्र, पोर्टलवरील तांत्रिक बिघाड येत्या दोन ते तीन आठवड्यात दुरुस्त होतील, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
यापूर्वी इन्फोसिस कंपनीने ऑगस्ट महिन्यापासून Income Tax पोर्टल व्यवस्थित कार्यरत होईल, असे म्हटले होते. मात्र, आता पंधरवडा उलटूनही या पोर्टलमधील तांत्रिक बिघाड काही केल्या संपायचे नाव घेत नाहीत. परिणामी करदात्यांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आयकर परतावा (Income Tax Return) आणि फॉर्म 16 भरण्याची अंतिम मुदत पुढे ढकलली होती.
Income Tax पोर्टल तयार करण्यासाठी केंद्र सरकारने इन्फोसिस कंपनीला 165 कोटी रुपये दिले होते. जानेवारी 2019 ते जून 2021 या काळात इन्फोसिस कंपनीला 164.5 कोटी रुपये अदा केले. पोर्टल तयार करण्याचे कंत्राट इन्फोसिसला जाहीर निवीदा प्रक्रियेच्या माध्यमातून मिळाले. पब्लिक प्रोक्योरमेंट पोर्टलच्या माध्यमातून (CPPP) कंत्राटाची प्रक्रिया पार पडली, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली होती.
www.incometax.gov.in हे पोर्टल 7 जूनपासून सुरु झाले होते. कर भरतानाची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले होते. मात्र, या नव्या पोर्टलचा वापर करताना करदात्यांना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. या पोर्टलवरील अनेक सुविधा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. त्याठिकाणी केवळ COMING SOON असा मेसेज दाखवला जात आहे.
मोदी सरकारने ई-फायलिंग पोर्टल तयार करण्याची जबाबदारी इन्फोसिस कंपनीकडे सोपवली होती. इन्कम टॅक्स रिटर्नच्या प्रक्रियेतील सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी 63 दिवसांचा अवधी लागतो. ही प्रक्रिया एका दिवसात पार पाडण्यासाठी इन्फोसिसला या पोर्टलची जबाबदारी देण्यात आली होती.
संबंधित बातम्या:
Income Tax लाँच करणार नवीन पोर्टल, करदात्यांसाठी कोणती सुविधा?