नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून प्रस्तावित कामगार कायद्याच्यानिमित्ताने भारतातील नोकरदारांसाठी चार दिवसांचा आठवडा लागू होऊ शकतो का, याविषयी बरीच चर्चा सुरु आहे. मात्र, आता काही भारतीय आयटी कंपन्यांनी ही गोष्ट प्रत्यक्षात अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळातही यावर बरीच चर्चा रंगली होती. कामाच्या अतिताणामुळे कर्मचाऱ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. साहजिकच याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या आणि पर्यायाने कंपनीच्या उत्पादनक्षमतेवर झाला होता.
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर TAC Security या भारतीय आयटी कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी चार दिवसांचा कामाचा आठवडा ठेवला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होऊन त्यांची उत्पादनक्षमता वाढेल, असा विश्वास कंपनीला वाटतो. चार दिवसांचा आठवडा प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात येईल. त्यामुळे TAC Security च्या मुंबई कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आता शुक्रवार, शनिवारी आणि रविवार अशी तीन दिवसांची सुट्टी असेल. सात महिने हा प्रयोग राबवला जाईल.
चार दिवसांचा आठवडा ही भविष्यातील कार्यशैली असेल. त्यासाठी TAC Security कंपनीने आतापासूनच पावले टाकायला सुरुवात केली आहे. जेणेकरून कर्मचाऱ्यांना काम आणि वैयक्तिक आयुष्याचे योग्य संतूलन साधता येईल. कंपनीच्या या घोषणेनंतर अनेक कर्मचाऱ्यांनी आपले छंद जोपासण्याच्यादृष्टीने किंवा नवीन काहीतरी शिकण्यासाठी विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे.
आर्थिक उलाढालीचा विचार करायचा झाल्यास सध्याच्या घडीला रिलायन्स ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. तर टाटा समूह हा देशातील सर्वात जुना उद्योगसमूह मानला जातो. मात्र, जेव्हा कर्मचाऱ्यांना (Employees) सुविधा पुरवण्याचा किंवा त्यांच्या समाधानी असण्याचा प्रश्न येतो तेव्हा या हे दोन्ही बलाढ्य उद्योगसमूह मागे पडतात. याबाबतीत डीएचएल आणि महिंद्रा या कंपन्या वरचढ ठरतात.
मुंबईतील एका संस्थेने ‘Great Places to Work’ या सर्वेक्षणातंर्गत एक यादी प्रसिद्ध केली होती. यामध्ये लॉजिस्टिक क्षेत्रातील DHL ही कंपनी अग्रस्थानी आहे. DHL नंतर कर्मचाऱ्यांसाठी चांगले वातावरण असलेल्या कंपन्यांमध्ये महिंद्रा समूहाचा क्रमांक लागतो.
‘ग्रेट प्लेस टू वर्क’च्या यादीत डीएचल आणि महिंद्रा समूहानंतर Intuit India, Aye Finance P Limited आणि Synchrony International Services या कंपन्यांचा क्रमांक लागतो. तर सिस्को ही आयटी कंपनी यादीत दहाव्या स्थानावर आहे. याशिवाय, सेल्सफोर्स आणि अॅडॉब या कंपन्याही पहिल्या दहा कंपन्यांमध्ये आहेत.
संबंधित बातम्या:
फक्त तीन दिवस उरले, मोदी सरकार नियम बदलणार?; नोकरदारांना 12 तास काम, 15 मिनिटांचाही ओव्हरटाईम