Indian Railways: भारतीय रेल्वेने आरक्षित डब्यातून वेटींग तिकिटावर प्रवास करण्यास मनाई केली आहे. रेल्वेने इंग्रजांच्या काळापासून असलेल्या या नियमाची अंमलबजावणी आता सुरु केली आहे. रेल्वे तिकीट कन्फर्म नसल्यास प्रवास करणे अवघड झाले आहे. टीटीई तुम्हाला डब्यातून उतरवणार आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे तिकीट कन्फर्म होणार की नाही? हे दाखवणारे अॅप भारतीय रेल्वे आणत आहे. येत्या सहा महिन्यांत या अॅपचे काम पूर्ण होणार आहे. या अॅपच्या माध्यमातून किती सीट रिकाम्या आहेत किती भरल्या आहेत, हे सर्व सांगितले जाणार आहे.
रेल्वेकडून कन्फर्म तिकीट प्रक्रियेची सुरुवात आगामी काही महिन्यांमध्येच करण्यात येणार आहे. या प्रक्रियेचा पहिला टप्पा डिसेंबर महिन्यापासून सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यात मोजक्या स्टेशनवर ही सुविधी मिळणार आहे. 500 किमी प्रवाशासाठी ही सुविधा सुरु होणार आहे. कन्फर्म तिकीट होण्याची शक्यता 90 टक्केपर्यंत येणार आहे. ही योजना लागू करण्यासाठी रेल्वे एक सुपर ॲप तयार करत आहे. येत्या सहा महिन्यांत सुरु होईल. या ॲपमध्ये प्रवाशांनी निवडलेल्या मार्गांवर प्रवास करण्यासाठी त्यांचा तपशील टाकताच त्यांना ट्रेनमध्ये किती जागा रिक्त आहेत आणि किती भरल्या आहेत याची माहिती दिली जाईल.
रेल्वे या मार्गांवर धावणाऱ्या मुख्य किंवा लोकप्रिय गाड्यांव्यतिरिक्त एक तासाच्या अंतराने दुसरी ट्रेन देखील चालवेल. जेणेकरून प्रवाशांना यातही कन्फर्म तिकीट मिळू शकेल. या ट्रेनचे डबे वेटिंग तिकीट धारकांच्या श्रेणीवर आधारित असतील. स्लीपर वेटिंग जास्त असल्यास त्याच श्रेणीचे डबे या ट्रेनमध्ये दिले जातील. जर प्रवाशांकडे स्लीपर तिकीट असेल आणि ट्रेनमध्ये एसी कोच जास्त असतील तर फरक आकारुन त्याला एसीमधून प्रवास करता येईल.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले होते की, आम्ही रेल्वेसाठी एक सुपर ॲप बनवणार आहोत, ज्यामध्ये रेल्वेशी संबंधित सर्व सुविधा असतील. 2031 पर्यंत वेटिंग संपणार आहे. प्रवाशांना आरक्षित तिकीट बुकिंग, अनारक्षित तिकीट बुकिंग, टूर पॅकेज बुकिंग, धार्मिक ट्रेन बुकिंग, फ्लाइट बुकिंग, कॅब आणि हॉटेल बुकिंग या सेवा या ॲपवर मिळतील. तसेच ई-केटरिंग, रिटायरिंग रूम आणि एक्झिक्युटिव्ह लाउंजचे बुकिंगही करता येणार आहे.