नवी दिल्ली : अक्षय तृतीयावर (Akshaya Tritiya) तुम्ही सोने खरेदी करण्याची योजना आखत असेल तर एक मोठी संधी मिळेल. सोन्याने गेल्या सहा महिन्यात मोठी भरारी घेतली आहे. सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. दिवाळीनंतर सोन्याने 11,000 रुपयांचा परतावा दिला आहे. आज शनिवारी, अक्षय तृतीयेला सोने स्वस्त आहे. सोने-चांदीचा भाव आज नरमला आहे. पण सोने लवकरच नवीन रेकॉर्ड (Gold New Record) करण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते एक पाऊल मागे घेऊन सोने पु्न्हा मोठी उसळी घेणार आहे. सध्या सोन्याने 61,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. लवकरच हा रेकॉर्ड ही इतिहासजमा होणार आहे.
किती होईल भाव
गेल्या सहा महिन्यात सोन्याने आगेकूच केली. चांदीने तर सोन्याच्या पुढे एक पाऊल टाकले. गेल्या फेब्रुवारीपासून तर दोन्ही मौल्यवान धातूंनी जोरदार चढाई केली आहे. त्यामुळे खरेदीदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोने -चांदीने रेकॉर्ड केला होता. हा विक्रम 5 एप्रिल रोजी मोडला. सोने थेट 61,000 हजारी मनसबदार झाले. त्यानंतर सोन्यात चढउतार सुरु आहे. पण तज्ज्ञांच्या मते, सोन्याचा भाव लवकरच 65 हजार प्रति 10 ग्रॅम होईल.
वायदे बाजारात भाव काय
शुक्रवारी, 21 एप्रिल 2023 रोजी वायदे बाजारात सोने जून महिन्यासाठी 737 रुपये घसरुन 59,766 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले आहे. यापूर्वी बाजारात सोने 60,476 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले होते. 5 मे 2023 रोजी कालावधी पूर्ण करणाऱ्या सोन्याच्या वायदे दिवशी हा भाव र 60,373 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आणि त्यात 653 रुपयांची घसरण होऊन ते 59,736 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले.
सोन्याच्या किंमती का भडकतील
तज्ज्ञांच्या मते, गेल्या एका महिन्यात सोन्याने भारतात 2000 डॉलर स्पॉट आणि 61000 रुपयांहून अधिकची किंमत गाठली आहे. त्यादृष्टीने त्यात मोठी तेजी दिसून आली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने गेल्या 12 महिन्यात 14 वर्षानंतरची सर्वाधिक वाढ, 500 आधार अंकांची वाढ नोंदवली आहे. त्यामुळे अमेरिकेत आर्थिक संकट आणि मंदीची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते सोने लवकरच 65 हजारांचा टप्पा गाठेल.
सोन्याची मोठी झेप
जर गेल्या पाच वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकली तर सोन्याची लांब उडी लक्षात येईल. सोने 31 हजार रुपयांहून 61 हजार रुपयांवर पोहचले आहे. सोन्याने गेल्या पाच वर्षांत दुप्पट कमाई करुन दिली आहे. आता 1 एप्रिलपासून हॉलमार्किंग सोने विक्री आणि खरेदी अनिवार्य करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून सोन्यावर (Gold) 6 अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्क कोड अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे शुद्ध सोन्याची हमी ग्राहकांना मिळाली आहे.
बँकांना कसली भीती
बँका आणि वित्तीय संस्थांना सोने ज्या गतीने आगेकूच करत आहेत, त्याच गतीने ते माघारी फिरेल असे वाटत आहे. म्हणजे सध्या सोन्याची जी वाढ आहे ती एक फुगवटा असल्याची भीती बँकांसह वित्तीय संस्थाना वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी एलटीव्ही 90 टक्क्यांहून कमी करण्यात आला आहे. 90 टक्क्यांआधारे कर्ज दिल्यास आणि भावात पुन्हा घसरण झाल्यास कर्ज बुडण्याची भीती बँकांना वाटत आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसला आहे.