Gold Hallmarking: हॉलमार्किंग सक्तीच्या विरोधात आज सराफ व्यावसायिकांचा राज्यव्यापी बंद

| Updated on: Aug 23, 2021 | 8:42 AM

Gold Hallmarking | 16 जूनपासून देशभरात हॉलमार्किंगच्या नियमाची अंमलबजावणी झाली होती. त्यानुसार आता सोन्याची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक आहे. मात्र, या सगळ्याविषयी ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्येही पुरेशी स्पष्टता नसल्याचे वारंवार दिसून आले आहे.

Gold Hallmarking: हॉलमार्किंग सक्तीच्या विरोधात आज सराफ व्यावसायिकांचा राज्यव्यापी बंद
नाशिकच्या सराफा बाजारपेठेत आज मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.
Follow us on

मुंबई: देशभरात सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंगचा नियम अनिवार्य झाला असला तरी त्याच्या अंमलबजावणीचे तीनतेरा वाजले आहेत. हॉलमार्किंगचा कारभार सरकारकडून मनमानी पद्धतीने हाकला जात असल्याप्रकरणी आता सराफा व्यापाऱ्यांना आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. हॉलमार्किंग सक्तीच्या विरोधात आज सराफ व्यावसायिकांकडून राज्यव्यापी बंद पाळण्यात येणार आहे. यामध्ये नागपूर, जळगाव आणि नाशिक या प्रमुख सोन्याच्या बाजारपेठांमधील व्यापारी सहभागी होतील.

केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबरची सक्ती केली आहे. ही सक्ती अन्यायकारक असून, त्यामुळे सराफ व्यवसाय धोक्यात येईल, असे सराफ संघटनांचे म्हणणे आहे. केंद्र सरकारच्या सक्तीचा निषेध नोंदवण्यासाठी आज सर्व सराफ व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने, व्यवहार बंद ठेऊन राज्यव्यापी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी सराफा व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

16 जूनपासून देशभरात हॉलमार्किंगच्या नियमाची अंमलबजावणी झाली होती. त्यानुसार आता सोन्याची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक आहे. मात्र, या सगळ्याविषयी ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्येही पुरेशी स्पष्टता नसल्याचे वारंवार दिसून आले आहे.

हॉलमार्किंगसाठी 5 ते 10 दिवसांचा अवधी

सध्याच्या HUID प्रणालीच्या माध्यमातून दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी 5 ते 10 दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हॉलमार्किंगमुळे सोन्यात कोणतीही भेसळ होणार नाही, असे सरकारला वाटते. मात्र, लहान व्यापाऱ्यांना सरकारने केवळ आपल्यावर नजर ठेवण्यासाठी हॉलमार्किंगचा नियम केल्याची भावना आहे. हॉलमार्किंगची प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ आहे. अशा पद्धतीने दागिने हॉलमार्क करवून घ्यायचे झाल्यास यंदा तयार झालेल्या दागिन्यांना हॉलमार्क करवून घेण्यासाठी तीन ते चार वर्ष लागतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

बीआयएस पोर्टलवर विक्री तपशील अपलोड करण्याची आवश्यकता नाही

बीआयएसच्या महासंचालकांनी स्पष्ट केले की, बीआयएस दागिन्यांच्या बी-टू-बी हालचालींवर लक्ष ठेवत आहे आणि ज्वेलर्सना त्यांच्या विक्रीचा तपशील बीआयएस पोर्टलवर अपलोड करण्याची आवश्यकता असल्याची बाब पूर्णपणे खोटी आहे. त्यासाठी ज्वेलर्सची गरज नाही.
ही योजना पूर्ण यशस्वी झालीय आणि एक कोटीहून अधिक दागिन्यांचे हॉलमार्किंग केल्यानंतर योजना पुढे ढकलणे किंवा मागे घेण्याविषयी बोलणे निरर्थक आहे. त्यांनी पुनरुच्चार केला की HUID आधारित हॉलमार्किंग सर्वांसाठी फायदेशीर आहे, कारण यामुळे या उद्योगाच्या कामात पारदर्शकता येते, ग्राहकांना त्यांच्या पैशांच्या बदल्यात योग्य वस्तू मिळण्याचा हक्क मिळतो आणि इन्स्पेक्टर राज वाढण्याची होण्याची शक्यता कमी होते. त्यांनी उद्योगातील लोकांना आवाहन केले की, त्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये आपले पूर्ण सहकार्य द्यावे आणि संपापासून दूर राहावे आणि सरकार त्यांच्या वास्तविक मागण्या पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

Gold: देशात एप्रिल-मे महिन्यात सोन्याची प्रचंड आयात; भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका

Gold: एक व्यक्ती किती सोने बाळगू शकते, काय आहे कायदा, जाणून घ्या सर्वकाही

सोन्याच्या भावात मोठी घसरण, भारताच्या परकीय चलनाच्या गंगाजळीला गळती

(Jewellers strike against gold hallmarking rules)