मुंबई : उकाडा जाणवायला लागला की थंड हवेसाठी वेगवेगळे पर्याय वापरले जातात. कोण एसी वापरतं, तर कोण कुलर वापरतं. त्यातल्या त्यात ज्यांच्याकडे कुलर आहे ते हवा आणखी थंड करण्यासाठी भारतीय जुगाड करतात. काही लोक कुलर बाहेर ठेवतात, कुणी कुलरच्या गवतावर प्रयोग करतात. मात्र, सध्या कुलरमध्ये थेट मडकं (माठ) ठेवण्याचा प्रयोग चर्चेत आहे. काय आहे हा प्रयोग, यामुळे किती फायदा होतो याचाच हा खास आढावा (Know story behind soil pot in cooler for cool wind Indian Jugad).
ऐकून खरं वाटणार नाही, पण हे खरं आहे की काही लोक हवा आणखी थंड करण्यासाठी कुलरमध्ये चक्क मडकं (माठ) ठेवत आहेत. कुलरमध्ये अशाप्रकारे मडकं ठेवल्यानं कुलरची हवा आणखी थंड होते असा या लोकांचा दावा आहे. यू-ट्यूबवर देखील असे अनेक व्हिडीओ आहेत. त्यातही कुलरमध्ये मडकं ठेवल्यानं हवा थंड होत असल्याचा दावा केला जातोय.
कुलरची हवा थंड करण्यासाठी काही लोक मडक्याला एक छिंद्र पाडून कुलरमधील पंप त्या मडक्यात ठेवत आहेत. यामुळे मडक्यातील थंड हवा पंपातून कुलरच्या गवतावर जाईल आणि कुलर अधिक थंड हवा देईल, असा दावा केला जातोय. सोशल मीडियावर असा दावा करणारे अनेक व्हिडीओ शेअर होत आहेत.
मडक्यातील पाणी बाष्पीभवनामुळे थंड होतं. जितकं अधिक बाष्पीभवन तितकं पाणी अधिक थंड होतं. मातीच्या भांड्यात छोटछोटे छिद्र असल्यानं या भांड्यांमध्ये धातूच्या भांड्यांच्या तुलनेत अधिक बाष्पीभवन होतं आणि पाणीही अधिक थंड होतं. मडक्यातील पाणी या छोट्या छिंद्रांमधून मडक्याच्या बाहेरच्या पृष्ठभागावर येतं आणि तेथे बाष्पीभवन होऊन उडून जातं. त्यामुळे मडक्याचा भाग थंड होऊन त्यातील पाणीही थंड होतं. विशेष म्हणजे जेव्हा अधिक तापमान असतं तेव्हाच या पाण्याचं पाष्पीभवन वेगाने होतं.
यू-ट्यूबवर अनेक व्हिडीओंमध्ये कुलरमध्ये मडकं ठेवल्यानं हवा अधिक थंड होते असा दावा केलाय. यासाठी या व्हिडीओंमध्ये हवेचं तापमानही मोजून दाखवण्यात आलंय. मात्र, काही व्हिडीओ असेही आहेत ज्यात मडकं ठेवल्यानं हवेच्या तापमानावर काहीही परिणाम होत नसल्याचं दाखवण्यात आलंय. मडकं ठेवण्याआधी जितकी थंड हवा येत होती तितकीच मडकं ठेवल्यानंतरही येते असं सांगण्यात आलंय.