रेल्वे प्रवासादरम्यान 5 वर्षांखालील मुलांसाठीही ट्रेनचे पूर्ण तिकीट विकत घ्यावे लागणार आहे, अशी बातमी सध्या व्हायरल झाली आहे. याबाबत सरकारी एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरोने (PIB – Press Information Bureau) पडताळणी केली असून या बातम्या चुकीच्या असून त्या भ्रम पसरवत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर लहान मुलांच्या तिकीटासंदर्भातील नियमांत (Ticket Rules) कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे भारतीय रेल्वेतर्फेही (Indian Railway) स्पष्ट करण्यात आले आहे. खरंतर, लहान मुलांच्या तिकीटाबद्दल रेल्वेचे नियम स्पष्ट असून त्यांचे तिकीट काढणे वा न काढणे हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. प्रवासादरम्यान लहान मुलांसाठी सीट अथवा बर्थ हवा आहे की नाही, यावर त्यांचे तिकीट काढायचे की नाही, हे अवलंबून असते. जर तुम्हालाही या बातमीबाबत काही संदिग्धता असेल, आणि हे नियम नेमके काय आहेत, हे समजत नसेल तर 5 वर्षांखालील मुलांसाठी रेल्वेचे नियम काय आहेत, ते स्पष्ट जाणून घेऊया
रेल्वेच्या नियमांनुसार, ट्रेनमध्ये आरक्षित केलेली सीट अथवा बर्थ याचा एकच प्रवासी वापर करु शकतो. मात्र 5 वर्षांखालील मुलांसोबत त्यांचे आई-वडील असणे आवश्यक असते. त्यामुळे आई किंवा वडील त्यांच्या 5 वर्षांखालील पाल्याला घेऊन एकाच सीटवर बसू शकतात, अशी सूट रेल्वेतर्फे देण्यात येते. लहान मुलांसाठ वेगळी सीट मिळत नसल्याने, त्यांचे वेगळे तिकीट घेणेही गरजेचे नसते. मात्र प्रवासादरम्यान लहान मुलांसाठी वेगळी सीट हवी , अशी आई-वडीलांची इच्छा असेल, तर ते त्यांच्यासाठी वेगळी सीट अथव बर्थ बूक करू शकतात. अशा वेळी, सामान्य प्रवाशांना लागू होणारे नियमच (लहान मुलांसाठीही) त्यांच्यासाठी लागू होतात. म्हणजेच 5 वर्षांखालील लहान मुलांसाठी वेगळी सीट अथवा बर्थ हवा असेल तर वयस्क नागरिकांच्या तिकीटासाठी लागेल, तेवढीच रक्कम भरावी लागते. 5 वर्षांखालील मुलांचे तिकीट काढणे वा न काढणे हा ऐच्छिक मुद्दा आहे. लहान मुलांसाठी वेगळी सीट बूक केली नसेल तर त्यांचे तिकीट विचारण्यात येत नाही. मात्र जर त्यांच्यासाठी सीट अथवा बर्थ मागितला गेला तर तिकीट काढणे किंवा आधीच जागा आरक्षित करणे, आवश्यक आहे.
https://twitter.com/PIBFactCheck/status/1559809354857349120