नवी दिल्ली: दिवाळीच्या पहिल्यात दिवशी केंद्र सरकारने देशातील सामान्य नागरिकांना महागाईचा झटका दिला आहे. पेट्रोलियम कंपन्यांकडून व्यावसायिक वापराच्या गॅसच्या दरात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 265 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. 1 नोव्हेंबरला पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात वाढ झाल्याची घोषणा केली. त्यामुळे व्यावसायिक वापराचा 19 किलोच्या सिलेंडरची किंमत 1736.5 रुपयांवरुन 2000.5 रुपये इतकी झाली आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या 14.2 किलो विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत 14.2 किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात तेल कंपन्यांनी सबसिडी फ्री 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 15 रुपयांनी वाढवली होती.
दिल्लीत आता अनुदानाशिवाय 14.2 किलोच्या सिलेंडरची किंमत 899.50 रुपये आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 926 रुपये, मुंबईत 899.50 रुपये आहे. चेन्नईमध्ये विनाअनुदानित सिलिंडरची किंमत आता 915.50 रुपये आहे.
भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करत आहे. ऑक्टोबर महिना संपेपर्यंत पेट्रोलने प्रतिलीटर 115 तर डिझेलने 110 रुपये प्रतिलीटरची पातळी गाठली आहे. त्यामुळे लवकर इंधनाचे दर 120 रुपयांच्या पलीकडे जातील, असा अंदाज आहे. यामुळे ऐन दिवाळीत महागाईचा भडका उडण्याची शक्यता असून त्यामुळे सामान्य नागरिक चिंतेत पडले आहेत.
भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात प्रत्येकी 35 पैशांची वाढ केली आहे. त्यानुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.50 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 106.62 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.34 आणि 98.42 रुपये इतका आहे.
संबंधित बातम्या:
Petrol price: ऐन दिवाळीत इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 115 तर डिझेलने 110 रुपयांचा टप्पा ओलांडला
पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्याने मोदी सरकारची ‘दिवाळी’; सरकारी तिजोरीत 1.71 लाख कोटींची भर
देशातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 120 रुपये तर डिझेल 110 रुपयांपलीकडे; जाणून घ्या कारण