मुंबई: दसरा आणि दिवाळीच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच सामान्य नागरिकांना महागाईचा तडाखा बसणार आहे. पेट्रोल-डिझेल, सीएनजी आणि पीएनजीपाठोपाठ आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी 6 ऑक्टोबरपासून घरगुती वापराच्या LPG साठी वाढीव दर जाहीर केले. त्यानुसार विनाअनुदानित 14.2 किलोच्या सिलेंडरच्या दरात 15 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत विनाअनुदानित गॅस सिलेंडरची किंमत 844.50 रुपयांवरुन 899.50 रुपये इतकी झाली आहे. तर दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरचा दर 884.50 रुपयांवरुन 899.50 रुपये इतका झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरचा (LPG) भाव वाढवण्यात आला होता. एलपीजीचा भाव एक-दोन रुपयांनी नव्हे तर 43.50 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांची दुकाने, स्टॉल्स, हॉटेल्स, रेस्टारंट किंवा ढाबे अशा सगळ्यांनाच झळ बसणार आहे. या सगळ्यांकडून खाद्यपदार्थांच्या किंमती वाढवल्या गेल्यास त्याचा अंतिम फटका सामान्य नागरिकांनाच बसणार आहे. दिल्लीत व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीसाठी 1736.50 रुपये मोजावे लागतील. यापूर्वी ही किंमत 1693 रुपये इतकी होती. तर कोलकातामध्ये हाच दर 1805 रुपये इतका झाला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरांनी सात वर्षांमधील उच्चांकी स्तर गाठल्याने भारतात इंधनाच्या दरात वेगाने वाढ होताना दिसत आहे. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे 30 पैसे आणि 37 पैशांची वाढ केली. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा हा वेग पाहता सामान्यांना पुन्हा एकदा धडकी भरली आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 108.96 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 99.17 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 102.94 आणि 91.42 रुपये इतका आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलर्स इतकी आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
या इंधन दरवाढीमुळे भोपाळ आणि जयपूरमध्ये पेट्रोलच्या किंमतीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलीटर 111 रुपये इतकी झाली आहे. तर डिझेलनेही शंभरी ओलांडली आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सोमवारी पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे 109.40 आणि 100.10 रुपये इतकी नोंदवण्यात आली. राजस्थान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन (आरपीडीए) च्या आकडेवारीनुसार, जयपूर जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलने शंभरी ओलांडली आहे.
इतर बातम्या:
कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?
दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका