Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल एकाच किंमतीने विकणार का, पेट्रोलियम मंत्री म्हणाले…

| Updated on: Jul 27, 2021 | 6:27 AM

Petrol and Diesel | GST Council ने पेट्रोल व डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश करण्याची कोणतीही शिफारस केलेली नाही. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती समान पातळीवर आणण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही, असे हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले.

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल एकाच किंमतीने विकणार का, पेट्रोलियम मंत्री म्हणाले...
पेट्रोल-डिझेल
Follow us on

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांमध्ये देशभरात इंधन दरवाढ हा मुद्दा सातत्याने चर्चेत राहिला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोलने शंभरी पार केली असली तरी डिझेलची दरवाढही तितक्याच वेगाने सुरु आहे. त्यामुळे आता भविष्यात पेट्रोल आणि डिझेल ही दोन्ही इंधने एकाच दराने विकली जातील, अशी चर्चा सुरु झाली आहे.

यासंदर्भात सोमवारी केंद्र सरकारकडून संसदेत स्पष्टीकरण देण्यात आले. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, GST Council ने पेट्रोल व डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश करण्याची कोणतीही शिफारस केलेली नाही. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती समान पातळीवर आणण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार नाही, असे हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले. पेट्रोल आणि डिझेलच्या मूळ किंमतीवर वेगवेगळ्या राज्यात वॅट आणि स्थानिक कर लागतात. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये तफावत असते, असे हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले.

2010 पासून पेट्रोल-डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार

2010 साली यूपीए सत्तेत असल्यापासून पेट्रोलियम उत्पादनांची किंमत ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसारच निश्चित होते. पेट्रोल-डिझेलवर 32 रुपयांचे केंद्रीय उत्पादन शुल्क आकारले जाते. या पैशांचा उपयोग पंतप्रधान गरीब कल्याण योजनेसाठी केला जातो. या माध्यमातून मोफत लसीकरण, शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किंमत यासारख्या योजनांसाठी निधी दिला जातो, असे हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले.

17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोल शंभरी पार

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर जवळपास 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, लडाख, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू, बिहार, केरळ, पंजाब, सिक्कीम, दिल्ली, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालचा समावेश आहे. यात सर्वप्रथम भोपाळमध्ये पेट्रोलची किंमत ही 100 रुपये प्रतिलिटरपर्यंत गेली होती, त्यापाठोपाठ जयपूरमध्येही पेट्रोलच्या किंमतीने शतक गाठलं होतं.

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

संबंधित बातम्या:

आता कोंबड्यांच्या विष्ठेपासून तयार होणार बायोडिझेल, एका लीटरमध्ये 38 किलोमीटर मायलेज

पेट्रोल-डिझेलचं ‘शतक’, मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात सरकारला अधिकचे पैसे पाहिजे म्हणून जास्तीचा कर

Inflation: ‘कॉमन मॅन’चा खिसा कापला जाणार; महागाईने तोडला आजवरचा रेकॉर्ड

 

(Petrol and Diesel in GST regime)