नवी दिल्ली: इंधन दराबाबत भारताने मुक्त बाजारपेठेचे धोरण स्वीकारल्याचे सांगत मोदी सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत सर्रास हात झटकताना दिसते. इंधनाच्या दरवाढीसाठी आंतरराष्ट्रीय परिस्थिती कारणीभूत असल्याचा बचाव भाजप नेत्यांकडून केला जातो. मात्र, प्रत्यक्षात ग्राहकांना फायदा देण्याची वेळ येते तेव्हा मोदी सरकारचे धोरण किती दुजाभाव करणारे असते, याचा प्रत्यय सध्या येत आहे.
काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात कोरोनामुळे कच्च्या तेलाची मागणी घटली होती. त्यामुळे खनिज तेलाच्या किंमतीने 40 डॉलर्स प्रतिबॅरल असा तळ गाठला होता. मात्र, त्यावेळी मोदी सरकारने तेलाचे दर कमी झाले म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तातडीने घटवल्या नाहीत. त्यावेळी भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी 50 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती केवळ 65 पैशांनी कमी केल्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाचा दर वेगाने वाढायला सुरुवात झाल्यानंतर त्याच पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या किंमती तातडीने वाढवल्या आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी हीच तत्परता कच्च्या तेलाचे दर कमी असताना का दाखवली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या दरवाढीचे पडसाद आता भारतात उमटायला सुरुवात झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किंमतीत प्रतिलीटर 24 पैसे तर डिझेलच्या दरात 32 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे सणासुदीचा हंगाम तोंडावर असताना महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.
पेट्रोलियम कंपन्याकंडून सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. पेट्रोलियम जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 108.19 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 98.16 रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा दर 112.13 रुपये प्रतिलीटर इतका आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचल्याने येत्या काही दिवसांत भारतात मोठी इंधन दरवाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. सोमवारी ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीने 2018 नंतर पहिल्यांदाच उच्चांकी पातळी गाठली. त्यामुळे येत्या काही दिवसांत कच्च्या तेलाचा दर प्रतिबॅरल 80 डॉलर्स इतका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात वाढ करणे अटळ मानले जात आहे. गोल्डमॅन सॅक्सच्या अंदाजानुसार या वर्षाच्या अखेरीस ब्रेंट क्रूडची किंमत $ 90 ला स्पर्श करू शकते.
जगभरात लॉकडाऊनचे निर्बंध हटल्यानंतर अनेक देशांमध्ये दैनंदिन व्यवहार पूर्ववत झाले आहेत. त्यामुळे वाहने पुन्हा मोठ्याप्रमाणावर रस्त्यावर आली आहेत. त्यामुळे इंधनाच्या पर्यायाने कच्च्या तेलाच्या मागणीत पुन्हा वाढ झाली आहे. मात्र, गेल्या काही काळात कच्च्या तेलाचे उत्पादन कमी झाल्याने सध्या बाजारपेठेत तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे दर वरच्या दिशेने प्रवास करत आहेत.
संबंधित बातम्या:
खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?
…म्हणून मोदी सरकार इंधनावरील कर कमी करण्यासाठी अनुत्सुक?
पेट्रोल-डिझेल पाठोपाठ आता सीएनजीच्या किंमतीही भडकल्या, पाहा किलोमागे किती रुपयांची वाढ…