नवी दिल्ली | 18 ऑक्टोबर 2023 : IMPS सेवेचा वापर करुन एका खात्यातून दुसऱ्या खात्यात झटपट रक्कम पाठवता येईल. ग्राहकांना सध्या आयएमपीएसच्या माध्यमातून रक्कम पाठवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या सेवेसाठी ग्राहकांचा खाते क्रमांक आणि आयएफएससी कोडची गरज लागते. ज्याला ही रक्कम हस्तांतरीत करायची आहे. त्याचा MMID पण लागतो. त्यानंतर ही रक्कम जमा होते. आता हा द्रविडी प्राणायाम बंद होणार आहे. ग्राहकांना नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे झटपट रक्कम हस्तांतरीत करता येणार आहे.
मोबाईल क्रमांक मदतीला
IMPS द्वारे रक्कम एका खात्यातून दुसऱ्या खात्यात हस्तांतरीत करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. आता युपीआय पेमेंटमध्ये केवळ मोबाईल क्रमांकाच्या आधारे रक्कम हस्तांतरीत करता येते. हाच धागा पकडत आयएमपीएस माध्यमात मोबाईल क्रमांका आधारे रक्कम हस्तांतरीत करण्यात येईल. तुम्ही 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम हस्तांतरीत करु शकाल.
काय आहे IMPS
IMPS ही एक रिअल टाईम पेमेंट सेवा आहे. ती 24X7 अशी काम करते. ही सेवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे (NPCI) सुरु आहे. यामध्ये तुम्ही त्वरीत पैसा हस्तांतरीत करु शकता. IMPS च्या माध्यमातून दोन प्रकारे पेमेंट अदा केले जाते. व्यक्ती ते खाते हस्तांतरणामध्ये ज्याला पैसे पाठवायचे त्याचा खाते क्रमांक, बँकेचे नाव आणि आयएफएससी कोड द्यावा लागतो. दुसरा प्रकार हा व्यक्ती ते व्यक्ती असा असतो. यामध्ये ज्याला पैसे पाठवायचे त्याचा मोबाईल क्रमांक आणि मोबाईल मनी आयडेंटिफायर (MMID) द्यावा लागतो. MMID हा 7 अंकी क्रमांक असतो. बँका हा क्रमांक देतात. मोबाईल बँकिंग एक्सेससाठी त्याचा वापर करण्यात येतो.
MMID चा त्रास
व्यक्ती ते व्यक्ती या माध्यमातून पैसा हस्तांतरीत करण्यासाठी भलेही कमी तपशिल द्यावा लागत असला तरी MMID ची गरज भासतेच. बँकेकडून फार कमी जण MMID हा क्रमांक घेतात. पण आता नव्या पद्धतीने कोणालाही झटपट पैसे पाठवता येतील. नवीन फीचरमध्ये MMID च्या जागी तुम्हाला फोन क्रमांक आणि बँकेचे नाव द्यावे लागेल. IMPS मध्ये लाभार्थ्याचे नाव न जोडता पण 5 लाख रुपयांपर्यंत रक्कम हस्तांतरीत करता येईल.
असा करा IMPS व्यवहार
IMPS व्यवहार करण्यासाठी अगोदर मोबाईल बँकिंग रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागेल. इंटरनेट बँकिंग, एटीएम अथवा बँकेच्या शाखेत जाऊन ही प्रक्रिया करण्याची गरज नाही. तुमच्याकडे ज्याला पैसे पाठवायचे आहे. त्याचा MMID क्रमांक आवश्यक असतो. नाहीतर तुम्हाला बँकेचा खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड द्यावा लागतो.