नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून लोकांचा छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा कल कमी होत आहे. त्याऐवजी शेअर बाजार आणि म्यूचल फंडामध्ये गुंतवणूक वाढत असल्याचे दिसून येत आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षांत डिमॅट खात्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. केवळ मोठ्या शहरातीलच नाही तर अगीदी छोटी शहरे आणि ग्रामीण भागातील गुंतवणूकदार देखील गुंतवणुकीसाठी शेअर मार्केट आणि म्यूचल फंडला प्राधान्य देत आहेत. याची नेमकी कारणे काय आहेत? शेअर मार्केटमधील गुंतवणूक का वाढत आहे? जाणून घेऊयात.
अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी नुकतीच लोकसभेमध्ये छोट्या बचत योजनांच्या संबंधित आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये विविध छोट्या बचत योजनांतर्गंत वर्षभरात देशात एकूण 4.66 कोटी ग्राहकांनी खाती उघडली होती. 2019-20 मध्ये त्यात घट होऊन हेच प्रमाण 4.12 कोटींवर आले तर 2020-21 मध्ये त्यात आणखी घसरण झाली, 2020-21 मध्ये 4.1ा कोटी लोकांनी छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली. तर चालू आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत केवळ 2.33 कोटी लोकांनी खाते उघडले आहे. दुसरीकडे डिमॅट खात्याबाबत बोलायचे झाल्यास गेले तीन वर्ष सात महिन्यात डिमॅट खात्यांची संख्या दुप्पट झाली आहे. 2018-19 मध्ये देशात एकूण 3.59 कोटी डिमॅट खाती होती. त्यामध्ये वाढ होऊन 2019-20 मध्ये त्याची संख्या 4.06 कोटींवर पोहोचली. मागील वर्षी एकूण 5.51 कोटी डिमॅटची खाती होती. चालू आर्थिक वर्षामध्ये आतापर्यंत या खात्यांची संख्या 7.38 कोटींवर पोहोचली आहे. दुसरीकडे 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत म्यूचल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडा देखील 2.75 कोटींवर पोहोचला आहे.
छोट्या बचत योजनांमधील गुंतवणूक कमी होण्याचे सर्वात मोठे कारण आहे, ते म्हणाजे मिळणारा परतावा. छोट्या बचत योजनांवर गुंतवणूकदारांना म्हणावा तसा परतावा मिळत नाही. तसेच कोरोना काळात अनेक बँकांनी ठेवीवरील आपले व्याजदर देखील कमी केले आहेत. व्याजदर कमी झाल्याने गुंतवणूकदारांचा तोटा होतो. तर दुसरीकडे पैसे शेअर मार्केट अथवा म्यूचल फंडमध्ये गुंतवल्यास चांगला परतावा मिळतो. शेअर बाजारात किंवा म्यूचल फंडमध्ये गुंतवणूकदारांना अधिक जोखीम असते. मात्र त्यातून अल्प काळात चांगला परतावा देखील मिळतो. परंतु छोट्या बचत योजनांचे तसे नसते, या योजनांमध्ये जोखीम नसते. मात्र परतावा मिळण्यास दीर्घ कालावधी लागतो. तसेच दीर्घ काळ पैशांची गुंतवणूक करून देखील अपेक्षीत परतावा मिळत नाही. म्हणूनच आज गुंतवणूकदारांचा शेअर मार्केटकडे कल वाढलेला दिसून येत आहे.
Gold Import Duty | सोन्याहून पिवळं! सीमा शुल्क आता फक्त 4 टक्के, सोन्याचे दर घसरणार
CBDC | आता भारताची स्वतःची डिजिटल करन्सी, CBDC चं रुपडं लवकरच लाँच होणार
नव्या वर्षात विमान प्रवास होणार स्वस्त?; जेट एअरवेज 2.0, अकासा प्रवाशांच्या सेवेत