नवी दिल्ली | 03 ऑगस्ट 2023 : ऑनलाईन गेमिंग महागणार हे गेल्या महिन्यातच निश्चित झाले होते. राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या समितीने (GoM) ऑनलाईन गेमिंगवर (GST Tax on Online Gaming) करामध्ये वाढ करुन तो 28 टक्के करण्याची शिफारस केली होती. पण त्यावर निर्णय घ्यायला सहा महिने लागले. गेल्या महिन्यात शिफारस मंजूर करण्यात आली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी जीएसटी कोणत्या महिन्यापासून लागू होणार याची माहिती दिली. 28 टक्के जीएसटी वसूल होत असल्याने केंद्र सरकारच्या तिजोरीत मोठी गंगाजळी येईल. जीएसटीच्या माध्यमातून केंद्र सरकारने महसूलात उंच भरारी घेतली आहे. तर ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांचा खिसा कापल्या जाणार आहे.
या राज्यांचा वेगळा पवित्रा
जीएसटी परिषदेनेनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या निर्णयाची माहिती दिली. दिल्ली, गोवा आणि सिक्कीम या राज्यांनी ऑनलाईन गेमिंग आणि कॅसिनो वर 28 टक्के कर लावण्याच्या निर्णयाचा पूनर्विचार करण्याची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
गेमिंग, हॉर्स रेसिंग, कॅसिनोवर 28 टक्के जीएसटी
गेमिंग, हॉर्स रेसिंग, कॅसिनोवर या निर्णयामुळे 28 टक्के जीएसटी जमा करावा लागेल. गेम ऑफ स्किल आणि गेम ऑफ चान्स असा कोणताही भेदभाव न करता सलग फेस व्हॅल्यूवर जीएसटी द्यावा लागेल. तर वाहनांच्या नोंदणीवर जीएसटी शेअर कंझ्युमर राज्याला पण देण्यात येईल.
कधीपासून अंमलबजावणी
गेमिंग, हॉर्स रेसिंग, कॅसिनोवर 28 टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय गेल्या महिन्यात घेण्यात आला. या निर्णयावर कधी अंमलबजावणी होणार, याची प्रतिक्षा होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या ऑक्टोबर महिन्यापासून जीएसटी लागू होईल, असे स्पष्ट केले.
सर्व प्रतिनिधी उपस्थित
वस्तू आणि सेवा कराबाबत (GST) जीएसटी परिषदेत चर्चा झाली. केंद्रीय अर्थमंत्री आणि सर्व राज्यांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते. बुधवारी ही प्रक्रिया कशी पूर्ण करण्यात येईल. याविषयीची चर्चा झाली.
दिल्लीच्या अर्थमंत्र्यांनी केला विरोध
दिल्लीच्या अर्थमंत्र्यांनी ऑनलाईन गेमिंगवर कर लावण्यास विरोध केला. तर गोवा आणि सिक्कीम या राज्यांनी कर लावण्यासंबंधीच्या प्रक्रियेत बदल करण्याची मागणी केली. कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशसह इतर राज्यांनी मागच्या बैठकीतील काही निर्णय लागू करण्याची मागणी केली.
ऑक्टोबरपासून अंमलबजावणी
केंद्रीय आणि राज्य यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार या संबंधीचे बदल करण्यात येतील. या सुधारणेनंतर ऑनलाईन गेमिंगवर नवीन कर ऑक्टोबर महिन्यापासून लागू होईल. हा नियम लागू झाल्यानंतर सहा महिन्यांनी त्याची समिक्षा करण्यात येईल. तोपर्यंत ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांचा गेम होणार हे नक्की.